

ठाणे : रुग्णाच्या जीवासाठी प्रत्येक क्षण अनमोल असतो. या प्रत्येक क्षणाला गती देण्यासाठी आता शासकीय रुग्णवाहिकांच्या सेवेत 'ड्राईव्ह ट्रॅक प्लस' कार्ड दाखल झाले आहे. डिझेलसाठी होणारी धावपळ तसेच रोख रकमेची अडचण दूर करून रुग्णवाहिकांची चाके अखंड फिरती ठेवण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागाने हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव विनायक निपुण आणि आयुक्त संजय काटकर यांच्या निर्णयानुसार महाराष्ट्र शासन आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार ठाणे जिल्ह्यातील शासकीय रुग्णवाहिकांसाठी 'ड्राईव्ह ट्रॅक प्लस' कार्ड उपलब्ध करून देण्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण तसेच दुर्गम आदिवासी भागातील रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचविण्यात रुग्णवाहिका सेवेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, डिझेलसाठी निधी उपलब्ध करून देताना येणाऱ्या अडचणींमुळे अनेकदा रुग्णवाहिका सेवेत अडथळे निर्माण होत होते. बुधवारी या कार्डचे वाटप ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
रुग्णवाहिका सेवा ही आपत्कालीन आरोग्यसेवेचा महत्त्वाचा दुवा आहे. डिझेल अभावी या सेवेत अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी 'ड्राईव्ह ट्रॅक प्लस' कार्ड उपयुक्त ठरणार आहे. विशेषतः दुर्गम भागातील रुग्णांना वेळेत सेवा मिळण्यासाठी याचा मोठा फायदा होईल. -
डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे