

ठाणे : येथील गुरुकुल सोसायटीचा पुनर्विकास हाती घेतलेल्या विकासकाने फसवणूक केल्याने यातील रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेतली होती. केळकर यांनी सातत्याने पाठपुरावा करून आर्थिक गुन्हे शाखेने विकासकावर कारवाई केली असून आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यामुळे संकुलाच्या स्वयंपुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
खोपट येथील कार्यालयात आयोजित १२५व्या जनसेवकाचा जनसंवाद कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना आमदार केळकर यांनी पाचपाखाडी येथील गुरुकुल सोसायटीच्या स्वयं पुनर्विकासाबाबत माहिती दिली. या गृहसंकुलाच्या पुनर्विकासाचे काम हाती घेतलेल्या विकासकाने रहिवाशांची भाडी थकवलीच, प्रकल्प पूर्ण करण्यातही अपयशी ठरला.
रहिवाशांनी विद्याधर वैशंपायन, ॲड. अल्केश कदम, विलास साठे यांच्यासह आमदार संजय केळकर यांची भेट घेतली. केळकर यांनी सातत्याने याबाबत पाठपुरावा करत प्रकल्पाला गती देण्यासाठी प्रयत्न केले.
अखेर आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी विकासकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. रहिवाशांना त्यांची प्रलंबित भाडी धनादेशाद्वारे अदा करण्यात आली असून विकासकाने नाहरकत पत्र दिले आहे. त्यामुळे गृहसंकुलाच्या स्वयंपुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती केळकर यांनी दिली.