ठाण्याला दुसऱ्या दिवशी संततधारेने झोडपले; २४ तासांत ६३.७ मिमि पाऊस, उकाड्यापासून दिलासा

ठाण्यात मंगळवारपासून पावसाला सुरुवात झाली असून या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. ठाणेकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात मागील २४ तासात ६३.७ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे तर ठाणे तालुक्यात सर्वाधिक १४९ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली.
ठाण्याला दुसऱ्या दिवशी संततधारेने झोडपले; २४ तासांत ६३.७ मिमि पाऊस, उकाड्यापासून दिलासा
ठाण्याला दुसऱ्या दिवशी संततधारेने झोडपले; २४ तासांत ६३.७ मिमि पाऊस, उकाड्यापासून दिलासा
Published on

ठाणे : ठाण्यात मंगळवारपासून पावसाला सुरुवात झाली असून या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. ठाणेकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. सकाळपासून ठाण्यात काही ठिकाणी संततधार तर काही भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मंगळवारी संध्याकाळपासून पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली. जिल्ह्यात मागील २४ तासात ६३.७ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे तर ठाणे तालुक्यात सर्वाधिक १४९ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. मंगळवारी रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे ठाणे शहरातील सखल भागात पाणी साचण्याच्या घटना घडल्या. तर दुसरीकडे धारण क्षेत्रातदेखील पाऊस झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

दरवर्षी साधारणत: जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे आगमन होत असे. मात्र, यंदा अल निनोच्या प्रभावामुळे मन्सून लांबला होता. त्यात मंगळवारीपासून जिल्ह्यातील विविध भागात पावसाचा जोर वाढल्याचे दिसून आले. मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवेवरदेखील काहीअंशी परिणाम झाला तर ठाणे शहरातील काही सखल भागात पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतुकीवरदेखील त्याचा परिणाम झाला होता.

घोडबंदरमध्ये वाहतूक कोंडी

तसेच घोडबंदर रोडवर देखील सकाळपासून वाहतूक कोंडी झाली होती. दुपारनंतर मात्र, वाहतूक सुरळीत झाल्याने वाहन चालकांना दिलासा मिळाला तर दुसरीकडे कल्याण-डोंबिवली शहरतील नालेसफाईची कामे न झाल्याने अनेक सखल भागात पाणी तुंबले. माळशेज घाटात छत्री पोइंट दरम्यान दरड कोसळली.

मागील २४ तासातील पाऊस

तालुका - पाऊस मिमी

ठाणे - १४९.४

कल्याण - ६९.६

मुरबाड - ५०.३

भिवंडी - ५५.९

शहापूर - ५३.९

उल्हासनगर - ६६.५

अंबरनाथ - ३३.३

झाडांची पडझड, दुचाकींचे नुकसान

ठाणे पालिका क्षेत्रात मागील २४ तासात ८२.३६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या कालावधीत झाडे पडण्याच्या घटना घडल्या असून यामध्ये दुचाकी वाहनांसह चारचाकी वाहनांचे नुकसान झाले असल्याची माहिती पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचेदेखील स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in