

ठाणे : ठाणे जिल्ह्याला पावसाच्या मुसळधार सरींनी अक्षरश झोडपून काढले. ठाणे जिल्ह्यातील शहरी धरण क्षेत्रात मंगळवारी संध्याकाळ पासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असल्याचे दिसून आले. मंगळवारी सकाळी ८.४० ते बुधवारी सकाळी ८.३० या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ९९ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. ठाणे शहरासह कल्याण - डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी आदी शहरातील सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. तर, सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शहरात मोठ्या प्रमाणात झाडांच्या फांद्या व झाडे उन्मळुन पडल्यावर चित्र दिसून आले. सुदैवाने या घटनांमध्ये कुठलीही जीवित हानी झाली नसून दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. तर, उल्हासनगर ४ मध्ये नाला तुंबल्याने त्याचे पाणी शेजारील २५ घरांमध्ये शिरल्याने तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
दरवर्षी साधारणता: जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे आगमन होत असे. मात्र, यंदा अल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबल्याचे दिसून आले. जून महिन्याच्या अखेरीस पावसाने दमदार हजेरी लावली असल्याचे दिसून आले. तसेच ठाणे जिल्ह्यात पुढील २ ते ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षासह सहा महापालिकांनी त्यांच्या स्तरावरील सर्व यंत्रांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशातच मंगळवारीपासून जिल्ह्यातील विविध भागात पावसाचा जोर वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे वातवरणात कमालीचा गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांची सुटका झाली. तर, या मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवेवर देखील काहीअंशी परिणाम झाला.
तक्रारींचा पाऊस
ठाणे शहरात मागील २४ तासात ५४ तक्रारी प्राप्त झाल्या असून यामध्ये सर्वाधिक २१ तक्रारी झाडांच्या फांद्या उन्मळून पडल्याच्या असून १२ ठिकाणी झाडे पडले आहे. तसेच सहा ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतुकीवर देखील त्याचा परिणाम झाला होता.
दरम्यान, उल्हासनगर कॅम्प ४ मध्ये नाल्यातील पाणी तुंबल्याने शेजारील २५ घरांमध्ये पाणी शिरले. तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
मागील २४ तासातील पाऊस (तालुका निहाय)
ठाणे - १०९.३
कल्याण - ८८.८
मुरबाड - ५४.५
भिवंडी - १६१.९
शहापूर - ९३.५
उल्हासनगर - ११९.०
अंबरनाथ - ७६.५
४१ टक्के घसरण
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ठाणे शहरात पावसाचे प्रमाण लक्षणीय घटल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आकडेवारीनुसार, १ जुलै दुपारपर्यंत शहरात ४८३ मिमी पावसाची नोंद झाली असून, गेल्या वर्षी २०२५) याच कालावधीत ८२०.२४ मिमी पाऊस झाला होता. म्हणजेच अवघ्या एका वर्षात पावसात सुमारे ४१ टक्क्यांची घट झाली आहे.