
ठाणे : ठाणे शहरात शुक्रवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर शनिवारी सकाळी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टच्या अंदाजानुसार, शनिवारी सकाळी १०.३० वाजेपर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या.
सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शहरातील काही सखल भागांमध्ये पाणी साचले होते. परिणामी, रस्त्यांवरील वाहतुकीवर आणि रेल्वेच्या वेळापत्रकावरही काहीसा परिणाम झाला. पावसामुळे काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याच्याही घटना घडल्या.
ठाणे महापालिकेच्या आपत्ती
व्यवस्थापन कक्षाला झाडाची फांदी पडल्याची एक, एका ठिकाणी पाणी साचल्याची आणि दोन इतर स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. विविध प्रकल्पांच्या कामामुळे अरुंद झालेले रस्ते आणि पावसामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे ही कोंडी झाल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.
पावसाची नोंद
मागील २४ तासांत, म्हणजेच शुक्रवार सकाळपर्यंत ठाण्यात ३६.३० मिमी पावसाची नोंद झाली होती, तर शनिवार सकाळपासून ११.३० वाजेपर्यंत शहरात आणखी ११.९४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
नागरिकांची गैरसोय
नवरात्रोत्सवामुळे शहरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या गरबा आणि दांडिया कार्यक्रमांवर या पावसाचे मोठे सावट दिसून आले. पहिल्याच दिवशी पावसामुळे गरबा खेळण्यात व्यत्यय आला होता. सामान्यतः रात्री १० वाजेपर्यंत गरबा खेळण्याची परवानगी असते. मात्र, पोलिसांनी नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन शनिवारी रात्री १२ वाजेपर्यंत गरबा खेळण्यास विशेष मुभा दिली आहे. तरीही, पावसाचा जोर कायम राहिल्यास गरबा आयोजनात मोठा विरजण पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.