ठाण्याला पावसाने धो धो धुतले...शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप; १०३ मिमि पावसाची नोंद

मागील दोन दिवसांपासून ठाणे शहरात पडत असलेल्या पावसामुळे ठाणे जलमय झाले असून शहरातील अनेक रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसत होते. ठाणे शहरात सोमवारी १०३ मिली पावसाची नोंद झाली. तीन दिवसांच्या सुट्टीनंतर कामावर जाणाऱ्या ठाणेकरांचे फारच हाल झाले. ठाणे-कासारवडवली मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली, तर दुसरीकडे शाळेतील विद्यार्थ्यांनाही पावसामुळे त्रासाला सामोरे जावे लागले.
ठाण्याला पावसाने धो धो धुतले...शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप; १०३ मिमि पावसाची नोंद
छायाचित्र : दीपक कुरकुंडे
Published on

ठाणे : मागील दोन दिवसांपासून ठाणे शहरात पडत असलेल्या पावसामुळे ठाणे जलमय झाले असून शहरातील अनेक रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसत होते. ठाणे शहरात सोमवारी १०३ मिली पावसाची नोंद झाली. तीन दिवसांच्या सुट्टीनंतर कामावर जाणाऱ्या ठाणेकरांचे फारच हाल झाले. ठाणे-कासारवडवली मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली, तर दुसरीकडे शाळेतील विद्यार्थ्यांनाही पावसामुळे त्रासाला सामोरे जावे लागले. कळवा येथे शाळकरी मुलांना छोट्या बोटीतून सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले. दरम्यान, ठाण्यासाठी हवामान खात्याने रेड अॅलर्ट दिला होता.

छायाचित्र : दीपक कुरकुंडे

मागील दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यात सोमवारी सकाळपासूनच पावसाने सर्वांची त्रेधातिरपीट उडवली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहरात पावसाने १०० नंबरी म्हणजे १०३ मिमी पावसाची नोंद झाली होती. सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने घोडबंदरवरील काजूपाडा, गायमुख येथील रस्ता पाण्याखाली गेला होता. तसेच येथील खड्डे देखील पुन्हा वाढल्याने येथील वाहतूक अतिशय धिम्या गतीने सुरू होती. दोन्ही बाजूंकडील वाहतुकीला त्याचा फटका बसला. पावसाचा जोर वाढल्याने दुपारच्या सत्रातील शाळांना अचानक सुट्टी जाहीर करण्यात आल्याने शाळेत आलेल्या किंवा शाळा गाठू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचेही हाल झाले. तिकडे शहरातील विविध भागात वृक्ष पडल्याच्या घटना घडल्या. पाणी साचले होते, शहरातील बहुतेक रस्त्यावरील वाहतुकीवर या पावसाचा परिणाम जाणवून आला.

गेले काही दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने शनिवारी ठाणे शहरात हजेरी लावली. भारतीय हवामान खात्याने १५ ते २० ऑगस्टदरम्यान ठाणे जिल्ह्यात पाऊस पडणार, असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार, १५ ऑगस्ट म्हणजेच शनिवारी सकाळपासून ठाणे शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर रविवारी सुट्टीचा दिवसही पावसाने सार्थकी लावल्याचे दिसून आले.

ठाणे ते कासारवडवली हे अंतर कापण्यासाठी अर्धा तासाचा अवधी लागतो. मात्र पावसामुळे याठिकाणी दीड तासाचा कालावधी जात होता. विटावा पुलाखाली देखील पाणी साचल्याने वाहतुक धिम्या गतीने सुरू होते. कोर्ट नाका, विवियाना मॉल, माजिवडा शांती सदन परिसरातही पाणी साचले होते. तर मुंब्यातील अमृत नगर, सोनाजी नगर, दारुल फलाह मस्जिदजवळ, कादर पॅलेस, कौसा बाजार, वाय जंक्शन, श्रीलंका रोड, दोस्तीजवळ, मुंब्रा शीळ रोड, चौधरी कंपाऊंड शिळ आदीसह दिव्यातील काही भागातही पाणी साचले होते.

तीन दिवसांच्या सुट्टीनंतर अनेकजण सोमवारी कामाला जात होते. या पावसामुळे या नोकरदारवर्गाचे चांगलेच हाल झाले. त्यांना नोकरीच्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब झाला. भाजी विक्रेते तसेच इतर फेरीवाले विक्रेते यांची देखील या पावसामुळे दैना उडल्याचे दिसून आले. तसेच शहरातील इतर सखल भागातही पावसाचे पाणी साचल्याचे दिसून आले. गांधी नगर कोपरी भागात वृक्ष पडल्याची घटना घडली. तसेच येथील स्मशानभूमीची संरक्षक भिंत देखील पडली.

पावसाची सरासरी

सकाळपासून काहीशा हलक्या पावसाच्या सरी बरसत होत्या. दुपारी १२.३० वाजता १६.२६ मिमी पावसाची नोंद झाली. मात्र त्यानंतर पावसाचा जोर वाढला आणि दुपारी २.३० वाजता २७.४४ मिमी पावसाची नोंद झाल, तर दुपारी ४.३० पर्यंत १०० मिमीपेक्षाही अधिकची नोंद शहरात झाली.

शाळकरी मुलांना बोटीचा सहारा

दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी देण्यात आली, तर सकाळच्या सत्रातील शाळांमधील मुले शाळेतच होती. अशातच वाढलेल्या पावसाचा फटका कळव्यातील शाळकरी मुलांना देखील बसल्याचे दिसून आले. कन्यू शिवाजी नगर येथील शाळेबाहेर पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. परिस्थिती गंभीर होताच स्थानिकांच्या मदतीने शाळकरी मुलांना छोट्या बोटीतून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले व अखेरीस पालकांच्या स्वाधीन करण्यात आल्यानंतर सुटकेचा श्वास सोडण्यात आला.

छायाचित्र : दीपक कुरकुंडे

मंगळवारी शाळा बंद ठेवण्याचा आदेश

सोमवारी पावसाचा जोर वाढल्याने ठाण्यातील खासगी शाळांनी दुपारी १२ च्या सुमारास दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर केली. परंतु तो पर्यंत अनेक विद्यार्थी घरून स्कूल बसने शाळेकडे रवाना झाले होते. काहींना अर्ध्यावरून घरी परतावे लागले, तर काहींना शाळेतून परत यावे लागल्याचे चित्र दिसून आले. दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून ठाण्यातील सर्व शाळा पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक (अनुदानित तसेच विनाअनुदानित) या मंगळवारी देखील बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेच्या शिक्षण विभागाने जारी केले आहेत.

गायमुख परिसरात वाहतूककोंडी

छायाचित्र : दीपक कुरकुंडे

घोडबंदर भागातील गायमुख परिसरात असलेल्या डोंगरातून पावसाचे पाणी खाली रस्त्यावर आले, तर या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे ते पाणी रस्त्यात साचले होते. त्यामुळे येथील वाहतुक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची दमछाक सुरू असल्याचे चित्र दिसून आले. त्यात येथील मार्गावर खड्डयांचे प्रमाण वाढल्याने आणि त्यात पाणी साचत असल्याने त्याचाही परिणाम वाहतुकीवर झाल्याचे दिसून आले.

logo
marathi.freepressjournal.in