ठाणे : घोडबंदर मार्गावरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी रात्री १२ ते सकाळी ६ या वेळेतच जड-अवजड वाहनांना प्रवेश देण्याचे आदेश असताना, गायमुख परिसरात काही वाहतूक कर्मचारी नियम मोडत असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला. या कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी त्यांनी व्यक्त केली.
भाजपच्या ‘जनसेवकाचा जनसंवाद’ या उपक्रमात पत्रकारांशी बोलताना केळकर म्हणाले, सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंद आहे. मात्र, गायमुखजवळ काही कर्मचारी वाहनांना सोडत आहेत. वाहतूक विभागाच्या आदेशाची कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. आगामी काळात कोस्टल रोड व मेट्रो सुरू झाल्यावर वाहतूक सुलभ होईल. तसेच दिल्ली-मुंबई मार्ग सुरू झाल्यावर वसईपुढील वाहतूक घोडबंदरकडे वळणार नाही, पण तोपर्यंत यंत्रणांनी सावध राहून खड्डे टाळावेत, सेवा रस्ते मोकळे ठेवावेत आणि वाहतूक नियमनावर विशेष लक्ष द्यावे.
कोविड काळात नियुक्त कर्मचाऱ्यांच्या तुलनेत जुन्या वैद्यकीय व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनातील असमानता दूर करण्यासाठी केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून तातडीने निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच चिपळूण येथील पाठबंधारे विभागाने ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या त्यांच्या मोबदल्याचा प्रश्न केळकर यांच्या हस्तक्षेपाने सुटण्यास सुरुवात झाली. त्यांनी प्रांत अधिकारी लीगाडे यांना फोन करून त्वरित कारवाईची सूचना केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. या उपक्रमात ठाणे, मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर, दादर, डोंबिवली, कल्याण, वसई, विरार, मुरबाड, शहापूर तसेच कोकणातील चिपळूण येथूनही नागरिकांनी तक्रारी नोंदवल्या. जनतेत निर्माण झालेल्या विश्वासामुळे आता जिल्ह्याबाहेरूनही केळकर यांच्याकडे तक्रारी येत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला सीताराम राणे (जिल्हा हाऊसिंग फेडरेशन अध्यक्ष), विकास पाटील (परिवहन सदस्य), भरत चव्हाण (माजी नगरसेवक), मृणाल पेंडसे (महिला मोर्चा अध्यक्षा), राजेश गाडे, अमित सरय्या, जितू मढवी, विशाल वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.
विविध तक्रारी दाखल
खोपट येथील भाजप कार्यालयात शुक्रवारी झालेल्या या कार्यक्रमात विकासकांकडून घर फसवणूक, इमारतींचे ओसी, महानगर गॅस व पाणीप्रश्न, महापालिकेचा वारसा हक्क, पतपेढी फसवणूक, एसआरए, ड्रेनेज लाइन व अनधिकृत बांधकाम यांसारख्या विविध तक्रारी नोंदवल्या गेल्या. यावेळी स्वामी कृपा सोसायटीच्या सभासदांनी पाणीटंचाईचा प्रश्न सोडविल्याबद्दल आ. केळकर यांचे आभार मानले. सोसायटीला ज्येष्ठ नागरिकांसाठी बेंच आणि डस्टबिन दिल्याची माहिती रहिवाशांनी दिली.