Thane : HSRP नंबरप्लेटसाठी एक लाख ६८ हजार ऑनलाइन अर्ज; १५ ऑगस्टपूर्वी अंमलबजावणीचे परिवहन विभागाचे आवाहन

राज्यातील सर्वच वाहनांवर एचएसआरपी (हाय सिक्युरिटी नंबरप्लेट) बसवणे आता शासनाने बंधनकारक केल्याने ठाणे जिल्ह्यात याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संकेतस्थळावर आतापर्यंत तब्बल १ लाख ६८ हजार वाहनधारकांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल केला आहे.
Thane : HSRP नंबरप्लेटसाठी एक लाख ६८ हजार ऑनलाइन अर्ज; १५ ऑगस्टपूर्वी अंमलबजावणीचे परिवहन विभागाचे आवाहन
Published on

ठाणे : राज्यातील सर्वच वाहनांवर एचएसआरपी (हाय सिक्युरिटी नंबरप्लेट) बसवणे आता शासनाने बंधनकारक केल्याने ठाणे जिल्ह्यात याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संकेतस्थळावर आतापर्यंत तब्बल १ लाख ६८ हजार वाहनधारकांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल केला आहे.

बनावट नंबरप्लेटमुळे होणारे गुन्हे, चोरीची वाहने, चुकीची ओळख आणि वाहतुकीशी संबंधित अनेक गुंतागुंतीचे प्रश्न लक्षात घेता, महाराष्ट्र शासनाने सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट अनिवार्य केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी ४ डिसेंबर २०२४ रोजी शासनाने आदेश जारी केला असून, १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनधारकांना नवीन एचएसआरपी बसवणे आवश्यक आहे. याप्रकरणी गती देणे गरजचे आहे.

प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेला गती मिळाली असून, आतापर्यंत १ लाख ६८ हजार अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी १ लाख ४३ हजार वाहनधारकांना अपॉइंटमेंट देण्यात आली आहे. त्यापैकी सुमारे १ लाख वाहनधारकांनी आपल्या वाहनावर नवीन एचएसआरपी यशस्वीरीत्या बसवले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली.

हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसवण्याच्या कामासाठी परिवहन विभागाने तीन अधिकृत कंपन्यांची नेमणूक केली आहे. नागरिकांनी अनधिकृत विक्रेत्यांकडून अशा प्लेट बसवू नयेत, कारण अशा नंबरप्लेटची नोंद केंद्र सरकारच्या डेटाबेसमध्ये होत नाही. त्यामुळे त्याचे कायदेशीर महत्त्व राहत नाही. वाहन सुरक्षा आणि कायदेशीर नोंदणीसाठी हाय सिक्युरिटी नंबरप्लेट लावणे आता अपरिहार्य झाले आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी जागरूकतेसाठी विविध उपक्रम राबवले जात असून ठाणेकर नागरिकांचा या मोहिमेला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. - रोहित काटकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ठाणे

logo
marathi.freepressjournal.in