ठाण्याची झणझणीत मामलेदारची मिसळ इतिहासजमा; तहसील कार्यालय परिसराच्या पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर इमारत जमीनदोस्त

ठाण्याच्या खाद्य संस्कृतीत सात दशकांहून अधिक काळ खवय्यांच्या तोंडी पाणी आणणारी 'मामलेदार मिसळ' ची जुनी वास्तू आज काळाच्या आड गेली असून तहसील कार्यालय परिसराच्या पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर ही ऐतिहासिक इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे. यामुळे ठाण्यातील खाद्यसंस्कृतीचा एक महत्त्वाचा अध्याय संपला आहे.
ठाण्याची झणझणीत मामलेदारची मिसळ इतिहासजमा; तहसील कार्यालय परिसराच्या पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर इमारत जमीनदोस्त
ठाण्याची झणझणीत मामलेदारची मिसळ इतिहासजमा; तहसील कार्यालय परिसराच्या पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर इमारत जमीनदोस्त
Published on

ठाणे : ठाण्याच्या खाद्य संस्कृतीत सात दशकांहून अधिक काळ खवय्यांच्या तोंडी पाणी आणणारी 'मामलेदार मिसळ' ची जुनी वास्तू आज काळाच्या आड गेली असून तहसील कार्यालय परिसराच्या पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर ही ऐतिहासिक इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे. यामुळे ठाण्यातील खाद्यसंस्कृतीचा एक महत्त्वाचा अध्याय संपला आहे. अनेकांच्या आठवणींना उजाळा देणारे हे ठिकाण आता इतिहासजमा झाले आहे.

१९५० च्या दशकात ठाणे तहसील कार्यालयाच्या आवारात एका छोट्याशा जागेत 'मामलेदार मिसळ'ची सुरुवात झाली. सुरुवातीला तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी येथे मिसळ खाण्यासाठी येत असत. 'मामलेदार' पदावरील अधिकारी या ठिकाणी नियमित येत असल्याने या दुकानाला 'मामलेदार मिसळ' हे नाव मिळाल्याची माहिती सांगितली जाते. तिखट, झणझणीत कट, घरगुती पद्धतीची चव यामुळे ही मिसळ रसिकांच्या मनात घर करून राहिली.

राजकीय दिग्गजांचीही पसंती या मिसळीची कीर्ती इतकी पसरली की, अनेक नामांकित व्यक्तींनी येथे भेट दिली. बाळासाहबे ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांसारख्या नेत्यांनी येथे येऊन मिसळीचा आस्वाद घेतला होता. विशेषतः राज ठाकरे ठाण्यातील कार्यक्रमांच्या वेळी येथे आवर्जून भेट देत असत.

फक्त राजकीय नेतेच नव्हे, तर कलाकार, व्यावसायिक, तसेच ठाण्याबाहेरील खाद्यप्रेमीही या ठिकाणी येत असत. त्यामुळे 'मामलेदार मिसळ' हे केवळ खाण्याचे ठिकाण न राहता ठाण्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनले होते.

पुनर्विकासामुळे ऐतिहासिक वास्तूचा शेवट

सध्या ठाणे तहसील कार्यालय, ठाणेनगर पोलीस ठाणे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी संपूर्ण परिसर मोकळा करण्यात आला असून, त्यात 'मामलेदार मिसळ'च्या जुन्या वास्तूचाही समावेश होता. तहसील कार्यालय तात्पुरते पार्किंग प्लाझा येथे हलवण्यात आले आहे, तर पोलीस ठाण्याचेही स्थलांतर करण्यात आले आहे. 'मामलेदार मिसळ' सध्या परिसरातील दुसऱ्या इमारतीत सुरू ठेवण्यात आले असून, पुनर्विकासानंतर नव्या जागेत पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती आहे.

आठवणी कायम, अनुभव अनिश्चित

नव्या इमारती, आधुनिक सुविधा आणि सुधारित पायाभूत सुविधा यामुळे परिसराचा चेहरामोहरा बदलणार असला तरी, जुन्या वास्तूतील त्या खास वातावरणाची जागा घेणे कठीण असल्याची भावना अनेक ठाणेकर व्यक्त करत आहेत. गर्दी, गप्पा, तिखट मिसळीचा सुगंध आणि त्या छोट्याशा जागेत अनुभवलेला आपलेपणा, या सगळ्यामुळे 'मामलेदार मिसळ' हे एक भावनिक ठिकाण बनले होते. आता नव्या रूपात ते परत येईल, पण 'त्या' जुन्या जागेची चव आणि माहोल तसाच राहील का, हा प्रश्न मात्र प्रत्येकाच्या मनात कायम राहणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in