
ठाणे : ठाणे शहरातील अनधिकृत शाळांविरोधात महापालिकेच्या शिक्षण विभागाने कठोर पावले उचलली आहेत. या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे इतर शाळांमध्ये समायोजन करण्यासाठी शिक्षण विभागाने दिवा भागात ९ पथके तैनात केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
या पथकांच्या माध्यमातून दिव्यातील ज्या ६५ अनधिकृत शाळांमध्ये तपासणी करण्याबरोबरच शाळा बंद करण्याबाबतच्या सूचना देणे, त्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना अधिकृत शाळेत प्रवेश घेण्याबाबत समजवून सांगणे, तसेच शाळा प्रवेश घेत असताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सहकार्य व्हावे, या दृष्टीने हे पथक काम करणार आहे. ठाणे महापालिका हद्दीत आजच्या घडीला ८१ अनधिकृत शाळा आहेत. त्यातील ६५ शाळा या एकट्या दिवा भागात आहेत. त्यातील ३२ शाळांचे पाणी कनेक्शन पालिकेने खंडित केले आहे. तसेच या शाळांविरोधात थेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुसरीकडे अनधिकृत शाळांमधील विद्यार्थ्यांचे अधिकृत शाळेत समायोजन करण्याबाबत पालिकेने यापूर्वीच सुरू केल्या आहेत. त्यानुसार दिव्यातील १७ अधिकृत शाळांच्या संस्थाचालकांसोबत बैठका घेण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत आवाहन देखील करण्यात आले आहे.
शिक्षकांची जुळवाजुळव सुरू
दिवा परिसरातील ६ इमारतीत ठाणे पालिकेच्या ७ शाळा भरत आहे. या शाळा सकाळच्या सत्रात भरत आहेत. त्यामुळे या शाळा आता दुपारच्या सत्रात देखील सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच दुपारच्या सत्रात शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक शिक्षकांची जुळवाजुळव करण्यात येत असून विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांची नेमणूक तासिका शिक्षक अथवा कशी करता येईल, याची चाचपणी देखील करण्यात येत असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
बेकायदा शाळांना अभय
अनधिकृत शाळांच्या संदर्भात ४० ते ४५ वेळा तक्रारी करण्यात येऊनही पालिकेच्या शिक्षण विभागाला याचे गांभीर्यच नसल्याने शिक्षण विभागाकडून कोणत्याच प्रकारची कारवाई या शाळांवर झालेली नाही. मात्र पुन्हा या शाळा सुरू झाल्या असून ही संख्या कमी होण्याऐवजी आता वाढल्याचे दिसून येत आहे. ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळेच या बेकायदा शाळांना अभय मिळत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
दिव्यात अनधिकृत ६५ शाळा
सध्या इंग्रजी शाळांना चांगली मागणी असल्याने नावाजलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रत्येक पाल्याला आपल्या मुलाला टाकणे शक्य होत नाही. त्यामुळे याचाच फायदा घेत झोपडपट्टी भागात अशा शाळांचे प्रमाण वाढत आहे. दिव्यात आजच्या घडीला ६५ शाळा या बेकायदा असल्याचा दावा या संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
अधिकृत शाळेकडे पालकांची देखील पाठ
अनधिकृत शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे मध्यमवर्गीय असून बहुतांश पालक हे मजुरीचे काम करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालक सभांना व अनधिकृत शाळेत प्रवेश घेण्याबाबत त्यांच्याकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. अधिकृत शाळेची फी ही अनधिकृत शाळेपेक्षा अधिक असल्याने पालकांनी देखील त्याकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता या अनधिकृत शाळांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी पालिकेचा शिक्षण विभागाने पावले उचलली आहेत.
दिव्यातील अधिकृत शाळांचा बंद
ठाणे दिव्यातील अनधिकृत शाळा बंद होत नसल्याने दिव्यातील अधिकृत शाळा १ जुलैपासून बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा इंडिपेन्डन्ट स्कूल मॅनेजमेंट असोसिएशन या संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत दरवर्षी शहरातील अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध केली जाते. या शाळांमध्ये पाल्यांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवू नये, असे देखील सांगितले जाते. महापालिका हद्दीत आताच्या घडीला मोठ्या प्रमाणात अनधिकृत शाळा असून यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा आकडा अधिकचा असलेला दिसून आला आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिव्यातील अधिकृत शाळा १ जुलैपासून बेमुदत बंद राहणार असल्याचा दावा संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.