ठाणे : अवजड वाहनांसाठी नवी शिस्त; होल्डिंग प्लॉट्स निश्चितीवर भर; रस्ते दुरुस्तीवर जोर

ठाणे व भिवंडी परिसरातील वाढत्या वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी जिल्हा प्रशासन व वाहतूक विभागाने मोठी पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जेएनपीटी व अहमदाबाद हायवेवरून येणाऱ्या अवजड वाहनांसाठी होल्डिंग प्लॉट्स निश्चित करण्याचे आदेश दिले असून, रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यावर भर दिला आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

ठाणे व भिवंडी परिसरातील वाढत्या वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी जिल्हा प्रशासन व वाहतूक विभागाने मोठी पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जेएनपीटी व अहमदाबाद हायवेवरून येणाऱ्या अवजड वाहनांसाठी होल्डिंग प्लॉट्स निश्चित करण्याचे आदेश दिले असून, रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यावर भर दिला आहे. दरम्यान, ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान सकाळी ६ ते रात्री १२ या वेळेत अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू राहणार आहे. प्रशासनाने नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा वाहतूक पोलीस प्रशासनाने दिला आहे.

ठाण्यातील वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी जेएनपीटी व अहमदाबाद हायवे-पालघर मार्गावरून येणाऱ्या अवजड वाहनांसाठी ‘होल्डिंग प्लॉट्स’ निश्चित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले. रस्त्यांची दुरुस्ती तातडीने पूर्ण करून ते सुस्थितीत ठेवण्याचेही आदेश त्यांनी दिले.

उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री उशिरा घेतलेल्या बैठकीनंतर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ही तातडीची समन्वय बैठक घेण्यात आली. मीरा-भाईंदर पोलीस आयुक्त निकीत कौशिक, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाठ, अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष व दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले की, प्रशासनाच्या उपाययोजनांना सहकार्य करावे ज्यामुळे वाहतूककोंडी कमी होईल आणि प्रवास अधिक सुलभ बनेल.

वाहनांची संख्या १० ते १५ टक्क्यांनी वाढली

नाशिक, पालघर, मुंबई-पुणे आणि जेएनपीटीकडून येणाऱ्या वाहनांची संख्या १० ते १५ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे येणारी व बाहेर जाणारी वाहने यांचा समतोल साधण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर समन्वय साधावा लागत आहे.

महत्त्वाचे निर्णय

  • होल्डिंग प्लॉट्सची व्यवस्था: शहरात अनावश्यक अवजड वाहतूक होऊ नये म्हणून मुख्य मार्गाबाहेरच वाहने थांबविण्यासाठी पार्किंग लॉट्स निश्चित करणे.

  • महत्त्वाच्या ठिकाणांचा आढावा: घोडबंदर रोड, माजिवडा जंक्शन, भिवंडी बायपास, चिंचोटी, शिळफाटा आणि कल्याण बायपास येथील कोंडी कमी करण्यासाठी पर्यायी मार्ग व नियंत्रण उपाययोजना राबविणे.

  • रस्त्यांची दुरुस्ती: घोडबंदर रोडवरील कामे पूर्ण होईपर्यंत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने दुरुस्ती.

  • वाहतुकीसाठी वेळापत्रक: मुख्य मार्गांवरून अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी विशिष्ट वेळा ठरविणे.

२ ऑक्टोबरपर्यंत कडक अंमलबजावणी

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील वाढत्या वाहतूककोंडीवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. महामार्गावरून ठाणे जिल्ह्यात येणाऱ्या जड-अवजड वाहनांना १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर, सकाळी ६ ते रात्री १२ या वेळेत प्रवेशबंदी लागू राहणार आहे. ही कारवाई प्रायोगिक स्वरूपात राबविण्यात येत असून नागरिकांचे हित व वाहतूक सुरळीततेसाठी उपाययोजना करण्यात आली आहे.

पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांनी ही अधिसूचना जाहीर केली असून, या निर्णयावर हरकती अथवा सूचना असल्यास ठाणे तीन हात नाका येथील वाहतूक विभाग कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नारपोली वाहतूक विभाग: चिंचोटी नाका येथे गुजरातकडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना ‘प्रवेश बंद’.

भिवंडी उप विभाग: वाडा रोड नदीनाका मार्गे येणाऱ्या १० चाकी व त्यापेक्षा जड वाहनांना पारोळ फाटा (नदीनाका) येथे प्रवेशबंदी.

कोनगाव उप विभाग: वडपा चेकपोस्ट मार्गे येणाऱ्या अवजड वाहनांना धामणगाव, जांबोळी पाईपलाईन नाका व चाविंद्रा नाका येथे थांबविण्यात येणार आहे.

रांजनोली चौक: रांजनोली नाका येथे १० चाकी व त्याहून मोठ्या वाहनांना शहरात येऊ दिले जाणार नाही.

कल्याण उप विभाग: नाशिकहून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांना भिवंडीतील बासुरी हॉटेल (सरवलीगाव) येथे प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in