सर्वात मोठा 'मेट्रो डेपो' ठाणे येथे होणार; एमएमआरडीएला जमीन हस्तांतरित, एका डेपोतून चार मेट्रो मार्गिकांचे होणार संचालन

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे जिल्ह्यातील मोघरपाडा येथे एकूण १७४.०१ हेक्टर क्षेत्रफळ जमीन अधिकृतपणे ताब्यात घेतली आहे. या जागेवर जागतिक दर्जाचा, एकात्मिक मेट्रो कार डेपो उभारण्यात येणार आहे. हा डेपो मेट्रो ४, ४ए, १० आणि ११ या मार्गिकांसाठी एक केंद्रीय संचालन व देखभाल केंद्र असणार आहे.
सर्वात मोठा 'मेट्रो डेपो' ठाणे येथे होणार; एमएमआरडीएला जमीन हस्तांतरित, एका डेपोतून चार मेट्रो मार्गिकांचे होणार संचालन
Published on

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे जिल्ह्यातील मोघरपाडा येथे एकूण १७४.०१ हेक्टर क्षेत्रफळ जमीन अधिकृतपणे ताब्यात घेतली आहे. या जागेवर जागतिक दर्जाचा, एकात्मिक मेट्रो कार डेपो उभारण्यात येणार आहे. हा डेपो मेट्रो ४, ४ए, १० आणि ११ या मार्गिकांसाठी एक केंद्रीय संचालन व देखभाल केंद्र असणार आहे. येथून सीएसएमटी ते मीरा रोड दरम्यान एकूण ५५.९९ किमीच्या मेट्रोमार्गाचे संचालन येथून होईल.

मोघरपाडा येथील सर्व्हे क्रमांक ३०मधील (जुना सर्वे क्रमांक २८) ही जमीन महाराष्ट्र शासनाच्या १६ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार एमएमआरडीएला ‘आहे त्या स्थितीत’ हस्तांतरित करण्यात आली आहे. या जमिनीवर चार मेट्रो मार्गिक उभारण्यासाठी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी) यांनी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला होता. मोघरपाडा मेट्रो डेपो हे मेट्रो ४, ४ए, १० आणि ११ या मार्गिकांसाठी एक महत्त्वाचे नियंत्रण व देखभाल केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे.

या डेपोमध्ये मेट्रो सेवा बंद असलेल्या वेळेत गाड्या उभ्या करण्यात येणार आहेत. तसेच सर्व मेट्रो गाड्यांची मोठी दुरुस्ती व नियमित देखभाल होईल. तसेच उपकरणे काढणे आणि नवीन बसवणे आणि त्यानंतर सुरक्षेसाठी आवश्यक ती पूर्ण चाचणी करणे, ट्रेन व डेपो प्रणालींचे कामकाज सुरळीत करण्यासाठी ऑपरेशन कंट्रोल सेंटर (ओसीसी) आणि डेपो कंट्रोल सेंटर (डीसीसी) यांच्यामार्फत एकात्मिक नियंत्रण कार्यप्रणाली अशा विविध सेवा येथे असणार आहेत.

शेतकरी केंद्रित पुनर्वसन मॉडेल

सिडकोच्या समतोल विकासाच्या मॉडेलशी सुसंगत अशी भरपाई पद्धत एमएमआरडीएने स्वीकारली आहे. या अंतर्गत प्रकल्पग्रस्तांना विकसित भूखंड देण्यात येतात, तर पट्टेधारक शेतकऱ्यांना त्यांच्या मूळ जमीनक्षेत्राच्या २२.५ टक्के भूखंड देण्यात येतात. अतिक्रमणधारकांना त्यांच्या मूळ जमीनक्षेत्राच्या १२.५ टक्के भूखंड देण्यात येतील.

मोघरपाडा मेट्रो डेपोमधील सुविधा

  • मोठ्या देखभालीसाठी १० वर्कशॉप ट्रॅक

  • दैनंदिन आणि नियमित तपासणीसाठी १० निरीक्षण ट्रॅक

  • रात्री गाड्या उभ्या करण्यासाठी ६४ स्टेबलिंग ट्रॅक

  • चाकांचे प्रोफाइलिंग करण्यासाठी अंडर-फ्लोअर व्हील लेथ

  • गाड्यांची स्वच्छता करण्यासाठी उच्च क्षमता असलेली ऑटो वॉश यंत्रणा

  • अंडरफ्रेम व छतावरील उपकरणांवरील धूळ काढण्यासाठी ब्लो-डाऊन प्लांट

  • कॅटेनेरी वाहने उभी करण्यासाठी व देखभालीसाठी सीएमव्ही वर्कशॉप

  • संचालनासाठी डेपो कंट्रोल सेंटर (डीसीसी) आणि प्रशिक्षण कक्ष

  • आवश्यक डेपो कर्मचाऱ्यांसाठी निवासी सुविधा

बांधकाम तातडीने सुरू होणार

एमएमआरडीएने ९०५ कोटींचे कंत्राट मे. एसईडब्ल्यू–व्हीएसई जॉइंट व्हेंचरला दिले आहे. त्यानुसार १३ जून २०२५ रोजी ‘नोटीस टू प्रोसिड’ (एनटीपी) जारी करण्यात आली असून, जमीन ठेकेदाराच्या ताब्यात अधिकृतपणे देण्यात आली आहे. यामुळे डेपोचे बांधकाम तत्काळ सुरू होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in