ठाणे कारागृह सर्वसामान्य नागरिकांना बघण्यासाठी खुले केले जाणार

१७३० मध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधायला सुरुवात केलेली आणि १७३७ च्या मार्च महिन्यात मराठी सैन्याने ठाणे जिंकून घेतले
ठाणे कारागृह सर्वसामान्य नागरिकांना बघण्यासाठी खुले केले जाणार

ठाणे शहर आणि कळवा खाडीच्या लगत असलेल्या ठाणे व कारागृहाला ऐतिहासिक महत्व आहे. या कारागृहात भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात या किल्ल्यामध्ये अनेकांना ठेवण्यात आले होते. त्यात आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर सावरकर, दत्ताजी ताम्हणे, साने गुरुजी आदींचा समावेश आहे. चापेकर बंधू, महादेव रानडे, जॅक्सनचा वध केलेले अनंत लक्ष्मण कान्हेरे यांना याच तुरुंगात फाशीची शिक्षा देण्यात आली. तुरुंगाचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान व स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान लक्षात घेऊन हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी वध स्तंभाच्या शेजारी नव्या दालनाची निर्मिती सुरु करण्यात आली असून हे दालन सर्वसामान्य नागरिकांना बघण्यासाठी खुले केले जाणार आहे.

ठाणे कारागृहाचा इतिहास खूप रंजक आहे. १७३० मध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधायला सुरुवात केलेली आणि १७३७ च्या मार्च महिन्यात मराठी सैन्याने ठाणे जिंकून घेतले. किल्ल्याचे अपुरे राहिलेले काम मराठ्यांनी पूर्ण केले आणि ठाणे खाडीच्या किनाऱ्यावर पाच भक्कम बुरुजांचा किल्ला उभा राहिला. सन १७७४ च्या डिसेंबरमध्ये ब्रिटिशांनी मराठ्यांकडून ठाणे जिंकून घेतले. ब्रिटिशांनी किल्ल्यातील अंतर्गत रचना बदलून सन १८३३ मध्ये याचे रूपांतर पूर्णपणे कारागृहात केले. सन १८७६ मध्ये तुरुंगाचा कायापालट करण्यात आला. किल्ल्यात स्वतंत्रपणे महिला बराक, रुग्णालय तयार करण्यात आले.

ऐतिहासिक वधस्तंभाच्या शेजारी नवे दालन

ज्या वधस्तंभाच्या ठिकाणी क्रांतिवीरांना फाशी देण्यात आली, त्या शेजारी नव्या दालनाची निर्मिती राज्यसरकारकडून करण्यात येत आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या दालनात क्रांतिवीरांच्या तसबिरी लावण्यात येणार आहेत. शनिवारी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि आमदार संजय केळकर यांनी या कामाची पहाणी केली. हे दालन सर्वसामान्य नागरिकांना बघण्यासाठी खुले केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

पूर्वीचा किल्ला आताचे कारागृह

ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये जेमतेम ११०० कैदी ठेवण्याची क्षमता आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून कारागृहामध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवले जात आहेत. सध्या कारागृहामध्ये ३ हजाराहून अधिक कैदी आहेत. त्यामध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची संख्या कमी आहे. उर्वरित हजारो कैदी हे कच्चे कैदी आहेत. एकीकडे कैद्यांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली असली तरी दुसरीकडे कारागृहातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या पूर्वीइतकीच आहे. ठाणे शहरातील ज्या मध्यवर्ती भागात तुरुंग आहे तो पूर्वी किल्ला होता.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in