ठाणे : जांभळी नाका येथील खाद्यपदार्थ विक्रीच्या दुकानाला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर परिसरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आगीच्या पाहणीत महावितरणच्या डीपीभोवतीच बांधकाम करून ती बंदिस्त करण्यात आल्याचे समोर आले. त्याचबरोबर दुकानांसमोरील पदपथांवर शेड उभारणे, साहित्य ठेवणे आणि फेरीवाल्यांकडून जागा अडविण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचताना अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जांभळी नाका परिसरातील ‘प्रीती सँडविच’ या दुकानाला मंगळवारी रात्री आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जवाहरबाग अग्निशमन केंद्राच्या जवानांनी दोन अग्निशमन वाहने आणि एका रेस्क्यू वाहनाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. या घटनेत सँडविच दुकानाचे मोठे नुकसान झाले. दुकानालगत असलेल्या महावितरणच्या डीपीलाही आगीची झळ बसली, तर शेजारील ‘न्यू नाईक गिफ्ट शॉप’च्या पुढील भागाचेही नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
घटनेनंतर परिसराची पाहणी केली असता महावितरणच्या डीपीभोवती बांधकाम करून ती बंदिस्त करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. विद्युत यंत्रणेजवळ अशा प्रकारे बांधकाम झाल्याने सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हे बांधकाम कोणी केले आणि त्याला परवानगी होती का, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. आग लागल्यानंतर हा प्रकार समोर आल्याने प्रशासनाचे आतापर्यंत याकडे दुर्लक्ष कसे झाले, असा सवालही उपस्थित होत आहे.
रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमणे केवळ वाहतुकीसाठीच नव्हे, तर आपत्कालीन परिस्थितीतही धोकादायक ठरू शकतात. आग, अपघात किंवा अन्य दुर्घटना घडल्यास अग्निशमन वाहने व रुग्णवाहिकांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी मोकळा मार्ग आवश्यक असतो. मात्र, वाढीव शेड आणि पदपथांवरील अतिक्रमणांमुळे हा मार्ग अरुंद होत असल्याचे चित्र आहे.
सहाय्यक आयुक्तांना घटनेची माहितीच नाही!
आगीच्या घटनेनंतर अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलीस तसेच लोकप्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, संबंधित सहाय्यक आयुक्त महेश जामनोर घटनास्थळी उपस्थित नसल्याने प्रभाग समितीच्या अध्यक्षा मीनल संख्ये यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यावेळी घटनेची माहिती नसल्याचे सांगण्यात आल्याने संख्ये यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी परिसरातील अतिक्रमणांचा मुद्दाही उपस्थित करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.
पदपथांवर दुकानदारांचे अतिक्रमण
जांभळी नाका परिसरातील पदपथांवर अनेक दुकानदारांनी शेड वाढवून घेतले असून दुकानांचे साहित्य, फलक आणि अन्य वस्तू पदपथावर ठेवण्यात येतात. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी चालण्याची जागाच उरलेली नाही. काही ठिकाणी फेरीवाल्यांनीही पदपथ व्यापल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. परिणामी वाहतूककोंडीसोबतच पादचारी सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
आयुक्तांकडे तक्रार; कारवाईचे आश्वासन
परिसरातील अतिक्रमणांबाबत मीनल संख्ये यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे. महावितरणच्या डीपीभोवतीचे बांधकाम, पदपथांवरील अतिक्रमणे आणि दुकानांसमोरील बेकायदा शेड यांची पाहणी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. भविष्यात अशा ठिकाणी दुर्घटना घडल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात, याकडेही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. संबंधित विभागाला पाहणी करून आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना देण्यात येतील, असे आयुक्तांनी आश्वासन दिल्याची माहिती संख्ये यांनी दिली.