Thane : कावेसरमध्ये महापालिकेची CBSE शाळा; पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा

सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि राष्ट्रीय स्तरावरील शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे महापालिकेने कावेसर येथे सीबीएसई (CBSE) बोर्डाची शाळा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे.
Thane : कावेसरमध्ये महापालिकेची CBSE शाळा; पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा
Thane : कावेसरमध्ये महापालिकेची CBSE शाळा; पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधाप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

ठाणे : सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि राष्ट्रीय स्तरावरील शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे महापालिकेने कावेसर येथे सीबीएसई (CBSE) बोर्डाची शाळा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. पूर्व प्राथमिकसह इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा असलेली ही शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. शाळेच्या संचालनासाठी इच्छुक संस्थांकडून ‘एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट’ (EOI) मागविण्यात येणार आहे.

ठाणे महापालिकेच्या विविध माध्यमांच्या एकूण १०२ प्राथमिक शाळा आहेत. त्यापैकी ११ शाळा स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर इंग्रजी माध्यमाच्या आहेत. खारेगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून महापालिका-क्रिस्टल हाऊस स्कूल क्रमांक १ ही CBSE संलग्न शाळा सुरू करण्यात आली आहे. या शाळेला मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेता, ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रभागात CBSE शाळा सुरू करण्याची सूचना महापौरांनी केली आहे.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी नृत्य, संगीत आणि कला यासाठी स्वतंत्र खोल्या, तसेच क्रीडा उपक्रमांसाठी आवश्यक हॉलची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शाळेच्या प्रत्येक मजल्यावर विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची सुविधाही उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुविधायुक्त शैक्षणिक वातावरण मिळण्यास मदत होणार आहे.

विशेष म्हणजे विद्यार्थ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू नये, यासाठी पुस्तके, गणवेश आणि आवश्यक शैक्षणिक साहित्य मोफत उपलब्ध करून देण्याची अट प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना CBSE अभ्यासक्रमाच्या दर्जेदार शिक्षणाची संधी मिळणार आहे.

ईओआयसाठी वर्तमानपत्रात जाहिरात

कावेसर येथील CBSE शाळेच्या संचालनासाठी इच्छुक संस्थांकडून ‘एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट’ (EOI) मागविण्यात येणार आहे. यासाठी वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यास तसेच महाटेंडर संकेतस्थळाच्या माध्यमातून इच्छुक संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यास महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली आहे. आता महासभेच्या मंजुरीनंतर पुढील प्रक्रिया सुरू होणार असून, त्यानंतर कावेसरमधील महापालिकेच्या CBSE शाळेचा मार्ग मोकळा होणार आहे. या शाळेमुळे कावेसर परिसरातील तसेच ठाणे शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि आधुनिक शिक्षणाची सुविधा महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

३,५८० चौ.मी. भूखंडावर शाळेची इमारत

कावेसर येथील चार सर्व्हे क्रमांकांमध्ये शाळेसाठी एकूण ३,५८० चौ.मी. आरक्षित भूखंड उपलब्ध आहे. या भूखंडावर तळमजला, स्टिल्ट आणि पहिल्या ते सातव्या मजल्यापर्यंतची इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचे एकूण बांधकाम क्षेत्र ४,११३.८५ चौ.मी. असून, इमारतीचा ताबा ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे देण्यात आला आहे. CBSEच्या निकषांनुसार विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शाळेत प्रशस्त वर्गखोल्यांसह ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष आणि मॅथ्स लॅब उभारण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मोफत

कावेसर येथील या शाळेच्या संचालनासाठी निवडण्यात येणाऱ्या संस्थेवर शाळेच्या दैनंदिन व्यवस्थापनाची जबाबदारी राहणार आहे. संबंधित संस्थेला पात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार असून, त्यांच्या वेतनाची जबाबदारीही संबंधित संस्थेकडे राहणार आहे. शाळेचे प्रशासन आणि दैनंदिन संचालनदेखील निवडलेल्या संस्थेमार्फत केले जाणार आहे. दरम्यान, शाळेसाठी आवश्यक असलेले टेबल, खुर्च्या, बाके, प्रोजेक्टर, स्मार्ट टीव्ही आदी शैक्षणिक साहित्य ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यावरही भर देण्यात येणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in