

ठाणे : कोपरीतील बीएसएनएल कार्यालयाजवळ एमडीची मोठी ‘डिलिव्हरी’ करण्यासाठी आलेल्या गोवंडीतील अब्दुल शेख (३३) याला ठाणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून तब्बल १ किलो १५२ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे २ कोटी ३० लाख ४० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
१४ ऑगस्टला पोलीस हवालदार अमोल देसाई यांना गुप्त बातमीदाराकडून एमडीच्या व्यवहाराची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून वरिष्ठांच्या आदेशानंतर पोलिसांनी कोपरीत सापळा रचला. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पांढरा टी-शर्ट आणि काळी पॅन्ट घातलेला इसम तेथे येताच बातमीदाराने पोलिसांना इशारा केला. पोलिसांनी क्षणार्धात त्याला घेरून ताब्यात घेतले. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा कलम ८(क), २२(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा एमडीचा साठा कोणाला देण्यात येणार होता आणि या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे तसेच अब्दुल शेखला २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती ठाणे शहर अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी दिली.
चॉकलेटी सेलोटेपने गुंडाळलेली पाऊच
अंगझडतीदरम्यान कमरेला खोचलेली काळ्या रंगाची प्लास्टिकची पिशवी मिळाली. त्यातील चॉकलेटी सेलोटेपने गुंडाळलेल्या झिप पाऊचमध्ये पांढऱ्या रंगाची क्रिस्टल पावडर आढळली. तपासणीनंतर ती एमडी असल्याचे समोर आले. वजन केल्यावर एमडीचे वजन १ किलो १५२ ग्रॅम भरले. पोलिसांनी एमडीसह १० हजार रुपयांचा मोबाईल आणि ९०० रुपये रोख असा एकूण २ कोटी ३० लाख ५० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.