

ठाणे : मान्सून अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना ठाणे महानगरपालिका प्रशासनाने शहरातील दरडप्रवण भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. डोंगर उतार, टेकड्यांच्या पायथ्याशी तसेच नाल्यालगत उभारलेल्या वस्त्यांमधील रहिवाशांना घरे खाली करण्याच्या नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, पावसाळ्यापूर्वी सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने यंदाही हजारो नागरिक जीव धोक्यात घालून त्याच ठिकाणी वास्तव्यास असल्याचे चित्र आहे.
महापालिकेमार्फत दरवर्षी मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला जातो. यंदा १६ एप्रिल रोजी झालेल्या विशेष बैठकीत शहरातील भूस्खलनाचा धोका असलेल्या परिसरांची माहिती संकलित करण्यात आली. विशेषतः डोंगर उतारांवर अनधिकृतपणे उभारलेल्या झोपड्या आणि नाल्यांच्या कडेला वसलेल्या वस्त्यांवर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. त्यानंतर संबंधित प्रभाग समित्यांना धोकादायक भागातील नागरिकांना नोटीस देऊन घरे रिक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, यापूर्वी अशा दुर्घटनांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. १७ जुलै २०२१ रोजी घोलाई नगर येथे दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली होती. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्या दुर्घटनेनंतर प्रशासनाने विविध उपाययोजनांची घोषणा केली होती. मात्र, चार वर्षांनंतरही अनेक कुटुंबे त्याच धोकादायक भागांमध्ये राहत असल्याचे वास्तव समोर आले आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी तात्पुरते का होईना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे आवश्यक आहे.
पावसाळ्यात भूस्खलनाचा धोका
महापालिकेच्या नोंदीनुसार पूर्वी ठाणे शहरात २६ दरडप्रवण ठिकाणे होती. काही ठिकाणी उपाययोजना केल्यानंतर ही संख्या कमी होऊन १४ वर आली असली, तरी आजही या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक वास्तव्यास आहेत. लोकमान्यनगर परिसरातील गुरुदेव आश्रमाजवळील वस्ती, उपवन परिसर, माजिवडा-मानपाडा प्रभागातील डोंगरीपाडा, पातलीपाडा आणि कळशीपाडा हे भाग अतिधोकादायक मानले जात आहेत. तसेच कळवा परिसरातील आतकोनेश्वर नगर, पौंडपाडा, शिवशक्ती नगर, घोलाई नगर, वाघोबा नगर आणि भास्कर नगर या वस्त्यांचाही दरडप्रवण क्षेत्रांमध्ये समावेश आहे, तर मुंब्रा परिसरातील आझादनगर, गावदेवी मंदिरालगतचा भाग, केणी नगर, सैनिक नगर आणि कैलास नगर येथेही पावसाळ्यात भूस्खलनाचा गंभीर धोका असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
मान्सूनपूर्व सुरक्षेच्या उपाययोजनांचा भाग म्हणून संबंधित प्रभाग समित्यांना दरडप्रवण भागातील रहिवाशांना नोटीस बजावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सहाय्यक आयुक्तांकडून नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
गजानन गोदेपुरे, उपायुक्त ठाणे महापालिका