
गेले काही महिने अनके नेत्यांच्या अपघाताच्या बातम्या समोर आल्या. अशामध्ये आणखी एका नेत्याचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. राज्याचे माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघत झाला आहे. त्यांच्या गाडीला डंपरने मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. यामध्ये त्यांना दुखापत झाली असून अंधेरीतील रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, घाबरण्यासारखे काही कारण नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक सावंत हे पालघरच्या मोखाद्यात कुपोषित मुलांच्या झालेल्या मृत्यूचा आढावा घेण्यासाठी होते. सकाळी ११.३०च्या दरम्यान ते घोडबंदरजवळ सगनाई नाका येथे पोहचले आणि मागून डंपरने धडक दिली. यामध्ये त्यांच्या मानेला आणि पाठीला दुखापत झाली असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच काशिमीरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी डंपर चालक इर्शाद शहजाद खानला ताब्यात घेतले आहे. तर, दीपक सावंत यांच्यावर अंधेरीमधील क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.