Thane : मृत्यूशी झुंजणाऱ्या बिबट्याला जीवनदान; वन विभागाची थरारक बचाव मोहीम यशस्वी

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बोरिवली वन परिक्षेत्रातील येऊर नियंत्रण क्षेत्रात जखमी अवस्थेत झाडावर बसलेल्या बिबट्याची वन विभागाने थरारक बचावमोहीम राबवत यशस्वी सुटका केली. गंभीर जखमी आणि अशक्त झालेल्या या बिबट्याला सुरक्षितपणे पकडून उपचारासाठी बिबट्या बचाव केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
Thane : मृत्यूशी झुंजणाऱ्या बिबट्याला जीवनदान; वन विभागाची थरारक बचाव मोहीम यशस्वी
Thane : मृत्यूशी झुंजणाऱ्या बिबट्याला जीवनदान; वन विभागाची थरारक बचाव मोहीम यशस्वी
Published on

ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बोरिवली वन परिक्षेत्रातील येऊर नियंत्रण क्षेत्रात जखमी अवस्थेत झाडावर बसलेल्या बिबट्याची वन विभागाने थरारक बचावमोहीम राबवत यशस्वी सुटका केली. गंभीर जखमी आणि अशक्त झालेल्या या बिबट्याला सुरक्षितपणे पकडून उपचारासाठी बिबट्या बचाव केंद्रात दाखल करण्यात आले आहे. पाचपाखाडी (इंदिरानगर) राखीव वन क्षेत्रातील सर्व्हे क्रमांक ५२० मध्ये शनिवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास एका झाडावर जखमी बिबट्या बसल्याचे वन कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. माहिती मिळताच वन विभाग, महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक मंडळ तसेच WWA आणि RAWW या संस्थांच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली.

बिबट्या गंभीर जखमी असल्याने त्याच्या हालचालींवर मर्यादा आल्याचे प्राथमिक पाहणीत स्पष्ट झाले. रात्रीच्या अंधारात बचावकार्य करणे धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याने वन विभागाने संपूर्ण रात्र परिसरावर कडेकोट नजर ठेवली. अखेर रविवारी सकाळी सहा वाजता शोधमोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. यावेळी संबंधित बिबट्या मूळ ठिकाणापासून सुमारे ७० ते ८० मीटर अंतर चालत जाऊन झाडीत पडल्याचे आढळून आले. त्यानंतर वन्यजीव अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी आणि बचाव पथकाच्या उपस्थितीत बिबट्याला सुरक्षितपणे भूल देऊन जेरबंद करण्यात आले.

प्राथमिक वैद्यकीय तपासणीत बिबट्याचे वय अंदाजे चार ते पाच वर्षे असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या चारही पायांच्या तळव्यांना गंभीर जखमा असून मागील पायावरील मोठ्या जखमेमुळे हाड उघडे पडल्याचे आढळले. तसेच शरीरावर अनेक ओरखडे आणि जुन्या जखमांचे व्रणही दिसून आले.

यानंतर जखमी बिबट्याला उपचारासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बोरिवली येथील बिबट्या बचाव केंद्रात हलविण्यात आले. सध्या त्याच्यावर तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. वन विभाग, बचाव पथक आणि स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून एका वन्यजीवाचा जीव वाचविण्यात यश आल्याने या मोहिमेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

बिबट्याच्या शरीरावरील जखमा गंभीर स्वरूपाच्या होत्या. त्यामुळे त्याला सुरक्षितपणे पकडून तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे आवश्यक होते. बचाव पथकाच्या समन्वयातून ही मोहीम यशस्वी झाली असून बिबट्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

मयुर सुरवसे, वनपरिक्षेत्र अधिकारी, येऊर

logo
marathi.freepressjournal.in