ठाणे : देशात उत्पादन केलेल्या वस्तूंची पुरवठा साखळी सुलभ करण्यासाठी औद्योगिक क्षेत्रांजवळ आधुनिक लॉजिस्टिक्स पार्क विकसित केले जात असून ठाणे जिल्ह्याचा यात समावेश आहे का? असा थेट सवाल खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत उपस्थित केला. हे पार्क पीपीपी तत्त्वावर विकसित करावे, या खासदार नरेश म्हस्के यांच्या सूचनेचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी स्वागत केले आणि भविष्यात ठाणे जिल्ह्यात लॉजिस्टिक्स पार्क उभारण्याचे संकेतही दिले.
ठाणे जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्षेत्र असून लघु, मध्यम आणि मोठे उद्योग कार्यरत आहेत.
पण, सुसज्ज लॉजिस्टिक्स सुविधांचा अभाव असल्यामुळे उद्योगांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे ठाण्यासारख्या औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरात लॉजिस्टिक्स पार्क उभारल्यास उद्योगांना मोठा फायदा होईल, रोजगारनिर्मिती वाढेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे खासदार म्हस्के यांनी सभागृहात नमूद केले.