ठाणे दर्पण अतुल जाधव
लोकसभेच्या निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी ठाणे शहरात सध्या कार्यकर्ते बैठका, मेळावे, राजकीय नेत्यांनी पुरस्कृत केलेले क्रिकेट सामने, महिला वर्गाचे सार्वजनिक हळदीकुंकू, शिबिरे, आरोग्य मेळावे यामध्ये राजकीय नेत्यांचा वावर, नेत्यांचे भावी म्हणून चौकात लागणारे कटआऊट लोकसभा निवडणुका उंबरठ्यावर असल्याचे संकेत देत आहेत.
लोकसभा निवडणुकीचा विषय समोर आल्यानंतर राज्यात काही लोकसभा मतदारसंघांची सर्वाधिक चर्चा होते, त्यात ठाणे लोकसभा मतदारसंघाचा समावेश होतो. बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे आगामी लोकसभा निवडणुकीत ठाण्यात नवीन समीकरण जुळू शकते अशी स्थिती असताना लोकसभा निवडणूक लढण्यासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येतेय तशी ठाणे लोकसभा मतदारसंघात चुरस वाढत चालली आहे.
सध्या या मतदारसंघासाठी अनेक नेत्यांची साखरपेरणी सुरू असून आपला दावा प्रबळ करण्यासाठी बॅनरबाजीच्या माध्यमातून आपण रेसमध्ये असल्याचा संदेश देण्यात अनेकांनी आघाडी घेतली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार राजन विचारे, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, त्याचप्रमाणे माजी महापौर व शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के, भाजपचे विनय सहस्रबुद्धे, संजय केळकर यांची नावे चर्चेत आहेत.
ठाणे लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी भाजपकडे होता. शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी पुढे हा मतदारसंघ भाजपकडून हिसकावून घेतला आणि येथून शिवसेनेच्या उमेदवारांना खासदार केला. रामभाऊ म्हाळगी, राम कापसे अशा अभ्यासू खासदारांची परंपरा लाभलेला हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात गेल्याची सल अजूनही भाजपच्या जुन्या जाणत्यांच्या मनात कायम आहे. म्हणून पुन्हा एकदा भाजपने या मतदारसंघावर दावा केला आहे. भाजपकडून ठाण्यातील आमदार संजय केळकर, संजीव नाईक आणि राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांची नाव चर्चेत आहेत. शिवसेना पक्षाचा विचार केला तर नरेश म्हस्के की रवींद्र फाटक यापैकी कोण रिंगणात उतरणार याचा निर्णय आगामी काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच घेणार आहेत.
राजन विचारेंची परीक्षा
ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ आहे. विद्यमान खासदार राजन विचारे हे जरी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत सहभागी झाले नसले तरी त्यांच्या एकट्याचा अपवाद वगळला, तर ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या तीन मोठ्या महापालिका येतात, तेथील जवळपास सर्वच नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे राजन विचारे यांनी जरी मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेला नसला तरी त्यामुळे शिवसेनेला त्याचा फार काही परिणाम होईल, असे वाटत नाही. राजन विचारे यांच्यासाठी पुन्हा निवडणूक लढवली तरी त्यांची विजयाची वाट खडतर असणार आहे.
ठाण्यासाठी सगळ्यांची धडपड
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गटात गेलेले आनंद परांजपे व नजीब मुल्ला यांनी राष्ट्रवादीचे ठामपातील २१ नगरसेवक आपल्यासोबत असल्याचा दावा करत ठाणे शहरावर राष्ट्रवादी (अजित पवार)गटाची पकड असल्याचा प्रयत्न केला आहे. तरी ‘कौन कितने पानी है’ आणि ठाणे लोकसभेसाठी कोण खरा दावेदार आहे हे येणारा आगामी काळच ठरवणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट, शिंदे गट आणि भाजपा यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष व माजी खासदार आनंद परांजपे हे देखील पुन्हा ठाणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात.
ठाणे बळकावण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू
ठाणे हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असल्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेना सहजासहजी भाजपला सोडेल असे तूर्त तरी जाणवत नाही, मात्र असे असले तरीदेखील ठाणे लोकसभा मतदारसंघातील भाजप नेत्यांनी या मतदारसंघात कमळ फुलवण्यासाठी चंग बांधला आहे. राज्यसभेचे माजी खासदार व रामभाऊ म्हाळगी संस्थेचे सर्वेसर्वा विनय सहस्रबुद्धे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघात आपला जनसंपर्क वाढवला असून विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचे ठाणे लोकसभा मतदारसंघात वाढत चाललेले दौरे हा चर्चेचा विषय ठरला आहे.