महाशिवरात्रीसाठी शिवालयात गर्दी उसळणार; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर, ठाण्यातील श्रीकौपिनेश्वर मंदिर, घोडबंदर रोडवरील जगन्नाथ मंदिर, खिडकाळीतील खिडकाळेश्वर महादेव मंदिर, भिवंडी लोणाडचे प्राचीन शिवमंदिर, टिटवाळ्यातील गंगागोरजेश्वर महादेव मंदिर, शहापूर-मुरबाड मार्गावरील श्री संगम क्षेत्र, डोंबिवलीतील पिंपळेश्वर महादेव मंदिर आदी विविध मंदिरांमध्ये भाविकांना...
महाशिवरात्रीसाठी शिवालयात गर्दी उसळणार; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

ठाणे: आज महाशिवरात्र म्हणजे भगवान शिवशंकराचा उत्सव ठाणे, रायगड आणि पालघरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्यासाठी अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर, ठाण्यातील श्रीकौपिनेश्वर मंदिर, घोडबंदर रोडवरील जगन्नाथ मंदिर, खिडकाळीतील खिडकाळेश्वर महादेव मंदिर, भिवंडी लोणाडचे प्राचीन शिवमंदिर, टिटवाळ्यातील गंगागोरजेश्वर महादेव मंदिर, शहापूर-मुरबाड मार्गावरील श्री संगम क्षेत्र, डोंबिवलीतील पिंपळेश्वर महादेव मंदिर आदी विविध मंदिरांमध्ये भाविकांना शिवाचे दर्शन घेता येणार आहे. यावेळी भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, म्हणून पोलिसांकडून पाचही परिमंडळात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून मंदिर व्यवस्थापकांनीही भाविकांच्या महाप्रसाद आणि दर्शनासाठी चोख व्यवस्था ठेवली आहे.

ठाण्यातील पुरातन श्रीकौपिनेश्वर मंदिरात पहाटेपासूनच भाविकांच्या शिवदर्शनासाठी रांगा लागतात. तर अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले असून भाविकांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शिळफाटा येथील खिडकाळेश्वर मंदिरही पुरातन असून ते एका तलावाकाठी वसलेले सुंदर नक्षीकाम असलेले मंदिर भाविकांचे विशेष आकर्षण आहे. येथेही कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, कळवा-मुंब्रा येथून भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात. टिटवाळ्यातील गंगा गोरजेश्वर महादेव मंदिर ही नदीच्या पात्रात असून येथे जाण्यासाठी भाविकांना होडीतून जावे लागते. तरीही येथे भाविकांची कल्याण पंचक्रोशीतून मोठी गर्दी उसळते. भिवंडीतील लोणाडचे शिवमंदिर हे प्राचीन दगडी कलेचा उत्तम नमुना असलेले मंदिरही भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू असून कल्याण, भिवंडी, शहापूर, मुरबाड आदी भागांतून भाविक येथे दर्शनाला येत असतात. शहापूर - मुरबाड रोडवरील किन्हवलीजवळील श्री संगम क्षेत्र महादेव मंदिर हे काळू नदीच्या तिरावर वसले असून येथे महाशिवरात्रीनिमित्त मोठी जत्रा भरते. आळेफाटा, पुणे, ठाणे, मुरबाड-शहापूर ते इगतपुरीपर्यंत भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात. त्याचप्रमाणे पालघरातील वाडा तालुक्यातील असलेले तिळसा गावातील श्री तिळसेश्वर महादेवाचे मंदिर नदी पात्रात वसलेले असून येथेही जाण्यासाठी भाविकांना पुलावरून प्रवास करत शिवदर्शन घेता येते. तर सुधागड तालुक्यातील आसरे-नवघर गावातील श्री विरेश्वर महादेव मंदिर पेशवेकालिन मंदिर असून कमळाच्या तळ्याकिनारी वसलेल्या शिवमंदिरात पाली, खोपोली, पनवेल, ठाण्यातून भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. या दिवशी येथे मोठी जत्रा भरते. पालखी मिरवणूक व महाप्रसाद व भजन-किर्तनाने सांगता होते.

अंबरनाथ शिवमंदिर २४ तास खुले राहणार

'हर...हर...महादेव’, ’ओम नमः शिवाय’ अशी गर्जना करत लाखो भाविक अंबरनाथ प्राचीन कालीन ’आंब्रेरेश्वर’ शिवमंदिराच्या परिसरात महाशिवरात्री यात्रोत्सवासाठी मोठ्या संख्येने दाखल होऊ लागले आहेत. महाशिवरात्री दरम्यान अंबरनाथ शिवमंदिर शनिवारी पहाटेपासूनच भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुले ठेवण्यात येणार आहे. भाविकांच्या सेवेसाठी अंबरनाथ नगरपालिका, शिवमंदिर पुजारी कमिटी, स्वयंसेवक तसेच पोलीस प्रशासन सज्ज करण्यात आले आहे. पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांसह इतर सुरक्षा यंत्रणा यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी सज्ज करण्यात आली आहे.

राजकीय पक्षांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन

आगामी निवडणुका लक्षात घेत मतदारांना खुश ठेवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सण-उत्सवामध्ये सहभागी होऊन मतदारांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करताना दिसत आहेत. महाशिवरात्र आणि जागतिक महिला दिन हा दुहेरी योग साधत वॉर्डावार्डात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन तसेच धार्मिक कार्यक्रमांना भेटीगाठी देण्यात राजकीय पक्षांचे नेते गुंतलेले दिसत आहेत. ठाण्यात साबुदाणा खिचडी, खजूर, दूध वाटपाचे आयोजन मंदिर परिसरात करण्यात येत आहे. काही ठिकाणी शिवरुद्र याेग, होमहवन विधी तर महिला दिनानिमित्त खेळ पैठणीचा, हेल्मेट वाटप, रोजगारविषयक प्रशिक्षण, शिलाई, घरघंटी मशीन वाटप अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते यांच्या वतीने करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in