

ठाणे : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका हद्दीत घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्याचा सविस्तर आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव उपस्थित होते.
बैठकीत नागरिकांना वेळेत गॅस मिळावा, यासाठी उपाययोजनांवर भर देण्यात आला. शहरात कुठेही गॅसचा काळाबाजार होत असल्याचे आढळल्यास तत्काळ कारवाई करण्याचे तसेच ज्या सोसायट्यांमध्ये महानगर गॅसची प्रलंबित कनेक्शन्स आहेत ती लवकर सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.
बैठकीत ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना सिलिंडर वेळेत मिळत असल्याचे एचपी गॅसच्या नोडल अधिकारी चित्रा नायर यांनी सांगितले.
वेटिंग लिस्ट कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. मात्र, लहान व्यावसायिकांना वेळेत गॅस मिळत नसल्याचा मुद्दा चर्चेत आला. याबाबत शासनस्तरावर चर्चा सुरू असून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीस उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, गटनेते पवन कदम, मुकेश मोकाशी, अभिजीत पवार, सरफराज खान, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील, पोलीस विशेष शाखेच्या मीना मकवाना, उपायुक्त मधुकर बोडके, शिधावाटप अधिकारी प्रशांत काळे, सुरेखा चव्हाण, सुभाष डुंबरे, रोहित माळकर तसेच विविध गॅस कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रलंबित जोडण्यांवर लक्ष
प्रत्येक प्रभागातील गॅस कनेक्शनसंदर्भातील मागण्या संकलित करून संबंधित कंपन्यांकडे पाठवण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार महानगर गॅस व इतर कंपन्यांनी प्राधान्यक्रम ठरवून कामे पूर्ण करावीत, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. दरम्यान, अनेक ठिकाणी पाईप गॅस कनेक्शन मंजूर असूनही प्रत्यक्ष पुरवठा सुरू नसल्याचे समोर आले आहे. काही भागांत ४ ते ५ वर्षांपासून गॅस पुरवठा प्रलंबित असल्याची बाबही उघडकीस आली. या प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले.