

ठाणे : पावसाळा ओसरत असतानाच ठाणे शहरात साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. बदलते वातावरण, अधूनमधून होणारा पाऊस आणि विविध ठिकाणी साचलेले पाणी यामुळे डासजन्य आजारांचा धोका वाढला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात १ ऑगस्ट ते २२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया, एच१एन१, एच३एन२ आणि लेप्टोस्पायरोसिसचे मिळून ३९१ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मलेरियाचे सर्वाधिक २०८, तर डेंग्यूचे १३८ रुग्ण आहेत. विशेष म्हणजे, सप्टेंबरच्या अवघ्या २२ दिवसांत डेंग्यूचे ७१ रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. कधी कडक ऊन, तर कधी पावसाच्या सरी, अशा बदलत्या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.
सर्दी, खोकला, अंगदुखी आणि तापाच्या तक्रारी घेऊन नागरिक जवळच्या दवाखान्यांसह महापालिकेच्या आरोग्य केंद्रांकडे उपचारासाठी धाव घेत आहेत.दरवर्षी पावसाळ्यात डासजन्य तसेच जलजन्य आजारांचा धोका वाढतो. यंदाही अशीच परिस्थिती असून, महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क असल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र, शहरातील काही भागांमध्ये साचलेले पाणी, अस्वच्छता आणि वाढता डासांचा प्रादुर्भाव पाहता प्रतिबंधात्मक उपाययोजनांना अधिक वेग देण्याची गरज निर्माण झाली आहे.
सप्टेंबरमध्ये रुग्णांमध्ये वाढ
ऑगस्ट महिन्यात ठाणे महापालिका क्षेत्रात मलेरियाचे ११२, डेंग्यूचे ६७, चिकुनगुनियाचे ४, एच१एन१चे २३, एच३एन२चे ३ आणि लेप्टोस्पायरोसिसचा एक रुग्ण आढळला होता. सप्टेंबरच्या २२ दिवसांत मलेरियाचे ९६, डेंग्यूचे ७१, चिकुनगुनियाचे ५ आणि एच१एन१चे ९ रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये मलेरियाच्या रुग्णांमध्ये काहीशी घट झाली असली, तरी डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये ६७ डेंग्यू रुग्ण आढळले होते. त्यानंतर सप्टेंबरच्या केवळ २२ दिवसांतच ७१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे पावसाळा संपत असतानाही डासजन्य आजारांचा धोका कायम असल्याचे दिसून येत आहे.
कॉलराचा एकही रुग्ण नाही
आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार, १ ऑगस्ट ते २२ सप्टेंबर या कालावधीत मलेरियाचे २०८, डेंग्यूचे १३८, एच१एन१चे ३२, चिकुनगुनियाचे ९, एच३एन२चे ३ आणि लेप्टोस्पायरोसिसचा एक रुग्ण आढळला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, या कालावधीत कॉलराचा एकही रुग्ण आढळलेला नाही.
डासांची उत्पत्ती रोखण्याचे आव्हान
शहरातील काही भागांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाला प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर द्यावा लागणार आहे. शहरातील पाणी साचणारी ठिकाणे, नाले, गटारे, बांधकामांच्या ठिकाणी असलेले खड्डे, भंगार साहित्य तसेच घरांच्या परिसरातील पाण्याचे साठे शोधून ते तातडीने नष्ट करण्याची गरज आहे.डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी नियमित धूरफवारणी आणि औषधफवारणी करणे, संवेदनशील भागांमध्ये विशेष पथकांमार्फत पाहणी करणे तसेच डासांच्या अळ्यांची उत्पत्ती होणारी ठिकाणे शोधून त्यावर आवश्यक ती उपाययोजना करणे गरजेचे आहे.