

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मानपाडा-कोलशेत परिसरातील प्रभाग क्रमांक ३ मधील राजकीय वातावरण तापले असतानाच माजी महापौर तसेच शिंदे गटाच्या ठाणे महिला जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे यांच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. आगरी समाजाविषयी अपमानास्पद शब्द वापरल्याचा आरोप असलेली एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहे.
व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये मीनाक्षी शिंदे यांनी आगरी समाजाबाबत आक्षेपार्ह भाषा वापरत पोलीस कारवाईच्या धमक्या दिल्याचा दावा केला जात आहे. या क्लिपमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, विरोधकांकडून तीव्र टीका केली जात आहे. मात्र, हा प्रकार पूर्णपणे खोटा असून, विरोधक आपल्या पराभवाच्या भीतीने बदनामीचा डाव खेळत असल्याचा आरोप मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे.
या संदर्भात मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकू लागल्यानेच माझ्याविरोधात फेक ऑडिओ क्लिप व्हायरल केली जात आहे. या ऑडिओशी माझा कोणताही संबंध नाही, असा ठाम दावा त्यांनी केला. काही व्हिडीओ कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या माध्यमातून तयार करण्यात आले असून, ते १२ तारखेला प्रसारित केले जाणार असल्याचाही दावा त्यांनी यावेळी केला. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, ऑडिओ क्लिपमध्ये ज्याचे नाव घेतले आहे, त्या व्यक्तीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
अशा प्रकारे आगरी समाजाबाबत अपमानास्पद भाषा वापरणे अत्यंत अयोग्य असून, हे खालच्या दर्जाचे राजकारण असल्याचा आरोप उद्धव सेना व मनसे महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
उद्धव सेना व मनसे महिला आघाडी आक्रमक
या प्रकरणावरून उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे महिला आघाडी आक्रमक झाली असून, संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मीनाक्षी शिंदे यांच्या कथित वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला. व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप मॉर्फ केल्याचे कोणतेही स्पष्ट संकेत नसल्याचा दावा यावेळी करण्यात आला. या संदर्भात मीनाक्षी शिंदे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली जाणार असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जर गुन्हा दाखल करून कारवाई झाली नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी रेखा खोपरकर, महेश्वरी तरे आणि समीक्षा मार्कंडे यांनी दिला.
जनतेचा कौलच अंतिम उत्तर देईल
चारित्र्यहनन करून जर निवडणुका जिंकता येतील असे कोणाला वाटत असेल, तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. राजकारणात विचारांची लढाई असावी; खासगी आयुष्यावर टीका करू नये. बाहेरून आलेल्या लोकांकडून येथे घाणेरडे राजकारण केले जात आहे. मात्र मानपाडा परिसरातील जनता त्यांना योग्य उत्तर देण्यासाठी सज्ज आहे. १६ तारखेला जनतेचा कौलच अंतिम उत्तर देईल, असे मीनाक्षी शिंदे यांनी सांगितले.