

ठाणे : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या तपासात आपण किंवा आपल्या कुटुंबीयांकडून कोणताही अडथळा निर्माण केला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी शुक्रवारी मांडली. या प्रकरणात आपल्या पतीलाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले असून, सध्या त्यांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर आपणही चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहू, असे त्यांनी स्पष्ट केले.
पोलिसांच्या तपासात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केला जाणार नाही, हे आपण यापूर्वीच स्पष्ट केले आहे, असे शिंदे यांनी सांगितले. आपल्या पतीला दोन दिवस चौकशीसाठी बोलावण्यात आले होते आणि ते चौकशीसाठी उपस्थितही राहिले. पोलिसांच्या कामकाजात अडथळा आणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
पोलिसांनी आपल्याला चौकशीसाठी बोलावल्यास आपणही सहकार्य करू, असे त्यांनी नमूद केले. महापालिकेतील महासभेचे कामकाज आणि विषय समित्यांच्या स्थापनेबाबत बोलताना मीनाक्षी शिंदे यांनी २०१७ मधील परिस्थितीचा दाखला दिला. त्या वेळीही सुमारे दीड वर्ष स्थायी समिती अस्तित्वात नव्हती; मात्र त्यामुळे महापालिकेचे कामकाज ठप्प झाले नव्हते. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीतही महापालिकेच्या कामकाजावर फार मोठा परिणाम होईल, असे वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. विषय समित्यांची स्थापना लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिंदे यांच्या नेतृत्वाकडे इतर पक्षांचे आकर्षण
एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांच्या वडिलांच्या राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चेवरही मीनाक्षी शिंदे यांनी भाष्य केले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम वाढत असून, इतर पक्षांतील अनेकांना त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. त्यामुळे अन्य पक्षांतील व्यक्तींनी पक्षात प्रवेश केल्यास त्यात गैर काहीच नाही. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व अनेकांना आवडत असल्याने पक्षाचा विस्तार होत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
आपण ज्या प्रभागात राहतो, त्या भागातील अनेक नागरिकांचा आपल्याशी संपर्क असतो. नागरिक विविध कामांसाठी आपल्याकडे येत असतात. अनेक जण वारंवार भेटत असतात. त्यामुळे एखादी विशिष्ट व्यक्तीच आपल्याला वारंवार भेटत होती किंवा तिच्याशी सातत्याने संपर्क होता, अशा स्वरूपाचे आरोप करणे योग्य नाही.
मीनाक्षी शिंदे, माजी महापौर