

फरियाल सय्यद/ठाणे
ठाणे (पश्चिम) येथील माजीवडा मेट्रो स्टेशनजवळील सर्व्हिस रोडवर शुक्रवारी भल्या पहाटे एका मेट्रो प्रकल्पाच्या रस्ते खोदकामादरम्यान ‘महानगर गॅस लिमिटेड’ (एमजीएल) ची १२५ मिमीची मुख्य गॅस वाहिनी फुटल्याची गंभीर घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानीची नोंद झालेली नाही.
वर्धमान गार्डनिया व विवियाना मॉलजवळ, हरदास नगर येथे सकाळी पावणेसहाच्या सुमाराला हा प्रकार घडला. मेट्रोचे काम करणाऱ्या अवजड मशिनरीमुळे जमिनीखालील नैसर्गिक गॅस वाहिनीला अचानक धक्का बसून ती पंक्चर झाली. यामुळे परिसरात गॅस गळती सुरू होऊन भीतीचे वातावरण पसरले होते.
गॅस गळतीची बातमी समजताच वर्तकनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी, ठाणे पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष व अग्निशमन दलाने फायर इंजिन व रेस्क्यू टेंडरसह घटनास्थळी धाव घेतली.
दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर
एमजीएलच्या तंत्रज्ञांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून बाधित वाहिनीचा मुख्य पुरवठा बंद (आसोलेट) केला. यामुळे होणारा संभाव्य मोठा धोका टळला. 'परिस्थितीवर त्वरित नियंत्रण मिळवण्यात आले असून, सध्या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे,' अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.