

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) ठाण्यातील पहिल्या मेट्रो मार्ग ४ आणि ४-अ च्या चार स्थानकांदरम्यान सोमवारी तांत्रिक तपासणी आणि चाचणी यशस्वीरित्या पार पडली. टप्पा-१ मधील गायमुख, गोवणीवाडा, कासारवडवली व विजय गार्डन ही स्थानके डिसेंबर २०२५ मध्ये प्रवाशांच्या सेवेत येतील तर संपूर्ण मार्ग सेवेत येण्यास ऑक्टोबर २०२७ साल उजाडणार आहे. ‘मेट्रो मार्ग-४’ आणि ‘४-अ’च्या चार स्थानकांदरम्यान तांत्रिक तपासणी आणि चाचणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री तथा एमएमआरडीए अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी पार पडली. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, विधान परिषद आमदार निरंजन डावखरे आणि प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी उपस्थित होते.
या प्रक्रियेत ‘कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी’ (सीएमआरएस) यांच्या आवश्यकतेनुसार सर्व तांत्रिक प्रणाली सज्ज आहेत की नाही, याची खात्री करण्यात आली. उड्डाणपूल, मार्गिका आणि ओव्हरहेड इक्विपमेंट पूर्ण झाले असून, लोड कॅल्क्युलेशन व सॉफ्टवेअर कॉन्फिगरेशनसाठी माहिती संकलित करण्यात आली. तसेच सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रणालींचे एकत्रीकरण तपासले गेले.
एमएमआरडीए प्रवासी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत असून, स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकनकर्ता (आयएसए) प्रमाणपत्र आणि त्यानंतर ‘सीएमआरएस’ मंजुरी घेण्यात येईल. सर्व वैधानिक मंजुरी पूर्ण झाल्यानंतरच हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येईल. सध्या ही मेट्रो ६ डब्यांची असेल पण भविष्यातील प्रवाशीसंख्येचा विचार करता प्लॅटफॉर्म ८ डब्यांसाठी बनवले गेले आहेत.