ठाणे : भविष्यात कोरोनासारख्या साथरोगांना आळा बसावा, रुग्ण आढळल्यास त्यांना तत्काळ आणि योग्य उपचार मिळावेत, तसेच या आजारांचे मूळ शोधून त्यांचा प्रसार थांबविण्यासाठी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यानुसार ठाण्यात 'मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट' सुरू करण्यात येणार आहे.
येत्या २ ऑक्टोबर रोजी या युनिटचा शुभारंभ होणार आहे. विशेष म्हणजे, ठाण्यातील हे युनिट केवळ महापालिकेसाठीच नव्हे, तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी काम करणार आहे. यामुळे जिल्ह्यातील इतर महापालिका आणि भागांनाही याचा मोठा फायदा होणार आहे.
मागील काही वर्षांपूर्वी कोरोनाने संपूर्ण देशात हाहाकार माजवला होता, त्यावेळी ठाणे जिल्ह्यानेही त्याची दाहकता अनुभवली. या पार्श्वभूमीवर, अशा प्रकारच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात हे युनिट सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मुंबईत हे युनिट यापूर्वीच सुरू झाले आहे.
ठाणे जिल्ह्यासाठी हे युनिट आता माजिवडा येथे उभारण्यात येत असून, त्यासाठी ठाणे महापालिकेने जागा उपलब्ध करून दिली आहे.
हा केंद्र सरकारचा उपक्रम असल्याने युनिटची देखभाल, निगा आणि तज्ज्ञांचे वेतन अशा सर्वच खर्चाची जबाबदारी केंद्र सरकारची असणार आहे. ठाणे महापालिका केवळ तज्ज्ञ डॉक्टरांची भरती प्रक्रिया राबवून जागा उपलब्ध करून देणार आहे. पहिल्या टप्प्यात केंद्राकडून यासाठी ३ कोटी १८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
युनिटचे प्रमुख कार्य
एखादा व्हायरल आजाराचे किंवा प्रमुख कारण शोधणे.
आजाराचे केंद्र (Epidemiological focus) शोधणे.
प्रतिबंधात्मक धोरणे राबवण्यासाठी मार्गदर्शन करणे.
महापालिकेमार्फत प्रमुख पदे भरली जाणार
या युनिटमध्ये पब्लिक हेल्थ डॉक्टर कार्यान्वित केले जाणार असून, ही पदे महापालिकेमार्फत भरली जाणार असून एकूण महत्त्वाची २३ पदे रिक्त आहेत. तर आगामी काळात वरिष्ठ पब्लिक हेल्थ तज्ज्ञ०१, पब्लिक हेल्थ तज्ज्ञ -०१, मायक्रोबायोलॉजिस्ट ०१, फूड सेफ्टी तज्ज्ञ ०१, रिसर्च असिस्टंट -०२ ही पदे त्वरित भरली जाणार आहेत. -