शिवाईनगर भागातील वाढीव पाणी बिलास स्थगिती; पाण्याच्या थकबाकीबाबत लवकरच निर्णय

शिवाईनगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दिलेल्या दंडात्मक पाणीपट्टीच्या नोटीसला स्थगिती देण्यात आली असून पाणीपट्टीच्या बिलावरील दंड पूर्णतः माफ करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या माजी नगरसेविका परिषा प्रताप सरनाईक यांनी दिली. त्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याशी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने बोलत होत्या.
शिवाईनगर भागातील वाढीव पाणी बिलास स्थगिती; पाण्याच्या थकबाकीबाबत लवकरच निर्णय
Published on

ठाणे : शिवाईनगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दिलेल्या दंडात्मक पाणीपट्टीच्या नोटीसला स्थगिती देण्यात आली असून पाणीपट्टीच्या बिलावरील दंड पूर्णतः माफ करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या माजी नगरसेविका परिषा प्रताप सरनाईक यांनी दिली. त्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याशी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने बोलत होत्या.

मुंबई महापालिकेच्या पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या सोसायटीधारकांचे मूळ बिलाची देखील फेर तपासणी करून टप्प्याटप्प्याने भरण्याची सोय केली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. याबरोबरच तांत्रिकदृष्ट्या ज्यांच्याकडे केवळ पाणी जोडणी आहे, परंतु पाणी येत नाही, अशा नागरिकांना दिलेले बिल पूर्ण माफ करण्याचे देखील आश्वासन यावेळी देण्यात आले असल्याचे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सांगितले.

या संदर्भात ठाणे शहरातील शिवाईनगर परिसरातील राहणाऱ्या नागरिकांना महापालिका व म्हाडाकडून दुहेरी पाणीबिलांची थकबाकी भरावी लागत असून त्यातून त्यांना मोठा आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याप्रकरणी तातडीने लक्ष घालावे, असे पत्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्या अनुषंगाने ठाणे महापालिकेच्या माजी नगरसेविका परिषा सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील नगरसेवकांचे शिष्टमंडळाने म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव जयस्वाल यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केले. निवेदन स्वीकारून सकारात्मक तोडगा काढल्याबद्दल माजी नगरसेविका परिषा सरनाईक यांनी म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव जयस्वाल यांचे आभार मानले आहेत. तसेच या संदर्भातील प्रश्न भविष्यात न सुटल्यास आपला लढा यापुढे देखील चालू राहील असे नि: संदिग्ध आश्वासन संबंधित सोसायटीच्या रहिवाशांना दिली आहे. या वेळी त्यांच्या सोबत माजी नगरसेविका विमल भोईर, ज्येष्ठ शिवसैनिक संजय कदम व शिवाई नगरमधील असंख्य रहिवासी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी

शिवाई नगर परिसरातील गिरीराज सोसायटी गीतांजली सोसायटी, शिवशक्ती सोसायटी, चिन्मय सोसायटी, प्रगती सोसायटी, ओम साई श्रद्धा सोसायटी, या म्हाडाच्या सोसायटीबरोबर श्री समर्थ सोसायटी, सहजीवन सोसायटी, सुनिती सोसायटी,एकरूप सोसायटी, सोसायटी, नवदुर्गा सोसायटी, गुरुकृपा सोसायटी, या सोसायटीतील नागरिकांना म्हाडाच्या तथाकथित अधिकाऱ्यांनी वेठीस धरले असून २०-२२ वर्षांनंतर अचानक दंडात्मक रकमेसह थकीत पाणीपट्टीची नोटीस पाठवणे हे अत्यंत चुकीचे असून असे तुघलकी आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी परिषा सरनाईक यांनी जयस्वाल यांच्याकडे केली.

दंडात्मक पाणीपट्टीच्या नोटीसला स्थगिती दिली असून पाणीपट्टीवरील दंडात्मक रक्कम पूर्ण माफ करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबरोबरच या सोसायटीधारकांना मुंबई महापालिकेच्या पाइपलाइनद्वारे अथवा ठाणे महापालिकेद्वारे पाणीपुरवठा होतो, यासंदर्भात सविस्तर अहवाल देण्याची निर्देश ठाणे महापालिका आयुक्तांना दिले आहेत. - संजीव जयस्वाल, उपाध्यक्ष म्हाडा

logo
marathi.freepressjournal.in