हवेच्या गुणवत्तेसाठी महापालिका सज्ज; ठाणे, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबईत धूळ नियंत्रण मोहीम गतिमान

हिवाळ्यात वाढलेल्या वायू प्रदूषणामुळे ठाणे, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबई या तिन्ही शहरांमध्ये हवा गुणवत्ता झपाट्याने खालावत आहे. मीरा-भाईंदर आणि नवी मुंबई महापालिकांनी धूळ नियंत्रणासाठी फवारणी, स्वच्छता मोहीमा आणि बांधकामांवरील कडक कारवाई गतीमान केली असतानाच, ठाण्यातील घोडबंदर रोडवर धोकादायक पातळीचे प्रदूषण नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करत असल्याची गंभीर नोंद माजी उपमहापौरांनी घेतली आहे.
हवेच्या गुणवत्तेसाठी महापालिका सज्ज; ठाणे, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबईत धूळ नियंत्रण मोहीम गतिमान
हवेच्या गुणवत्तेसाठी महापालिका सज्ज; ठाणे, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबईत धूळ नियंत्रण मोहीम गतिमान
Published on

हिवाळ्यात वाढलेल्या वायू प्रदूषणामुळे ठाणे, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबई या तिन्ही शहरांमध्ये हवा गुणवत्ता झपाट्याने खालावत आहे. मीरा-भाईंदर आणि नवी मुंबई महापालिकांनी धूळ नियंत्रणासाठी फवारणी, स्वच्छता मोहीमा आणि बांधकामांवरील कडक कारवाई गतीमान केली असतानाच, ठाण्यातील घोडबंदर रोडवर धोकादायक पातळीचे प्रदूषण नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करत असल्याची गंभीर नोंद माजी उपमहापौर नरेश मणेरा यांनी घेतली आहे. रस्ते खोदकाम, मेट्रो प्रकल्प आणि अनियंत्रित बांधकामांमुळे निर्माण झालेल्या धूळकणांवर तात्काळ आणि कठोर उपाययोजना कराव्या, अशी त्यांनी ठाणे महापालिका आयुक्तांकडे मागणी केली आहे.

ठाणे : घोडबंदर रोड बनतोय आरोग्यविघातक; हवा प्रदूषणावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत कापूरबावडी ते गायमुख या परिसरातील घोडबंदर रोडवर सध्या मेट्रो प्रकल्प, मुख्य रस्ता व सेवा रस्त्यांचे विलीनीकरण, पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिनी टाकणे तसेच मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली इमारत बांधकामांमुळे ठिकठिकाणी खोदकाम झाले आहे. या खोदकामामुळे निर्माण झालेली माती, धूळ आणि सतत होणारे धुलीकरण यामुळे परिसरातील हवा अत्यंत धोकादायक व आरोग्यविघातक बनली आहे. या परिस्थितीवर तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माजी उपमहापौर नरेश मणेरा यांनी ठाणे महापालिका आयुक्त डॉ. सौरभ राव यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.

मणेरा यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अक्षम्य हलगर्जीपणा आणि निष्क्रियतेमुळे घोडबंदर रोड विभागातील नागरिक, आबालवृद्ध तसेच या भागातून प्रवास करणारे इतर नागरिक धोकादायक हवा प्रदूषणामुळे श्वसनविकार, डोळ्यांचे विकार आणि इतर आरोग्य समस्यांनी त्रस्त झालेले आहेत. प्रदूषण नियंत्रण विभागाने पूर्वीच नियमावली तयार करून उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद केली असताना, प्रत्यक्षात मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याने परिस्थिती गंभीर झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रदूषण नियंत्रण विभाग निष्क्रिय

मणेरा यांनी निदर्शनास आणून दिले की, रस्त्यांवरील मातीच्या ढिगाऱ्यांवर दररोज पाण्याची फवारणी करणे, माती अथवा रॅबीट वाहून नेणाऱ्या डम्पर्सवर अनिवार्यपणे आच्छादन घालणे, बांधकाम स्थळी पडदे किंवा नेट बसविणे हे सर्व प्रदूषण नियंत्रण विभागाच्या नियमांनुसार बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदार, डंपरमालक आणि विकासकांवर मोठ्या दंडाची तरतूद असूनही महापालिकेचा प्रदूषण नियंत्रण विभाग निष्क्रीय राहिल्याचा आरोप त्यांनी केला.

रस्ते खोदून माती ढिगाऱ्यांवर पडलेली, आच्छादनाशिवाय माती वाहून नेणारे डंपर्स आणि बांधकामांवरील अनियंत्रित धूळ यावर कारवाई न करता महापालिका प्रदूषण नियंत्रण विभाग डोळेझाक करत आहे. हा विभाग खरोखर ‘प्रदूषण नियंत्रण’ म्हणावा की ‘प्रदूषण निर्माण’ विभाग म्हणावा?, असा थेट सवाल पत्रात उपस्थित केला आहे. घोडबंदर रोड परिसरातील वाढत्या व धोकादायक हवा प्रदूषणावर तत्काळ नियंत्रण आणावे, संबंधितांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी आणि याबाबत तातडीचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत.

नरेश मणेरा, माजी उपमहापौर

नवी मुंबई महापालिकेचे काटेकोर नियोजन

नवी मुंबई : हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन युद्धपातळीवर कामाला लागले आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार मागील आठवड्यापासून सुरू झालेल्या स्वच्छता आणि प्रदूषण नियंत्रण मोहिमांनी गती घेतली असून त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून शहरातील AQI (Air Quality Index) मध्ये सुधारणा दिसून येत आहे.

नवी मुंबई महापालिकेचे काटेकोर नियोजन
नवी मुंबई महापालिकेचे काटेकोर नियोजन

घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अखत्यारित शहरात सखोल स्वच्छता मोहिमा सातत्याने राबविण्यात येत आहेत. तुर्भे एमआयडीसीमधील गुडविल कन्स्ट्रक्शन साइटवर झालेल्या मोहिमेत ब्रश झाडूंनी रस्ते व परिसराची स्वच्छता करण्यात आली त्याचबरोबर जमा झालेली माती त्वरित गोळा करून जेट स्प्रे वाहनाने प्रक्रियाकृत पाण्याची फवारणी देखील करण्यात आली. याप्रकरणी संबंधित व्यावसायिकाकडून दंडाची वसुली अशा सर्वांगीण पद्धतीने धूळ नियंत्रणाची कारवाई करण्यात आली. नवी मुंबईत विविध विकासकामांमुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. ENCAP च्या डस्ट सप्रेसर (फॉगर्स) द्वारे हवेत पाण्याचे सूक्ष्म फवारे सोडून धूळ खाली बसवणे ही मोहीम नियमितपणे सुरू आहे.

वायू प्रदूषण नियंत्रणात कुठलीही ढिलाई चालणार नाही; नियमित आणि काटेकोर अंमलबजावणीच होणार. नियमित पाहणी, स्वच्छता मोहिमा, दंडात्मक कारवाई आणि तांत्रिक उपाययोजना यामुळे नवी मुंबईत AQI मध्ये लक्षणीय सुधारणा दिसत आहे.

डॉ. कैलास शिंदे, आयुक्त महापालिका

RMC प्रकल्पांवर करडी नजर

शहरातील प्रदूषणात सर्वाधिक वाटा विकासकामांदरम्यान निर्माण होणाऱ्या धुळीचा असल्याने, महापालिकेने विभागनिहाय पथके तयार करून ८६ बांधकाम साइट्सची पाहणी केली आहे. या ठिकाणी मानक कार्यपद्धती (SOP) पाळली जात नसल्याने नोटिसा देण्यात आल्या असून पुढील पाहणीत त्रुटी कायम राहिल्यास दंडात्मक कारवाई, त्या साइटवरील काम आठवडाभर बंद अशी कठोर भूमिका प्रशासनाने घेतली आहे.

मीरा-भाईंदर शहरात डस्ट कंट्रोल यंत्रामार्फत धूळ नियंत्रण

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील वाढत्या धूळकणांच्या प्रमाणावर नियंत्रण आणण्यासाठी महानगरपालिकाकडून डस्ट कंट्रोल यंत्रामार्फत पाण्याची फवारणी सुरू करण्यात आली आहे. शहरातील पर्यावरणास सुरक्षित ठेवत नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या निर्देशानुसार डस्ट कंट्रोल यंत्रणेचा वापर करून नियमितपणे पाण्याची फवारणी करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे रस्त्यावरील धूळकणांचे प्रमाण कमी होऊन हवेची गुणवत्ता सुधारण्यास मोठी मदत होत असल्याचा पालिकेचा दावा आहे.

शहरातील प्रमुख मार्गांवर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते फाऊंटन ते गायमुख परिसरात डस्ट कंट्रोल मशीनच्या सहाय्याने पाण्याची व्यापक फवारणी करण्यात आली. प्रभाग समिती क्रमांक ३, ४, ५ आणि ६ च्या कार्यक्षेत्रातही डस्ट कंट्रोल यंत्रणेचा वापर करून पाण्याची फवारणी करण्यात आली. विविध प्रभागातील महत्त्वाच्या रस्त्यांवर आणि प्रदूषणप्रवण परिसरांमध्ये ही फवारणी करून धूळकणांचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मीरा-भाईंदर शहरात डस्ट कंट्रोल यंत्रामार्फत धूळ नियंत्रण
मीरा-भाईंदर शहरात डस्ट कंट्रोल यंत्रामार्फत धूळ नियंत्रण

विविध उपाययोजना नियमितपणे राबविणार

वाहतुकीची सततची वर्दळ, रस्त्याचे कामे आणि कोरडे वातावरण यामुळे निर्माण होणाऱ्या धुलीकणांमुळे परिसरातील हवा दूषित होत असल्याचे दिसून येते. नागरिकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळावे, यासाठी सतत प्रयत्नशील असून आगामी काळातही शहरातील विविध भागांमध्ये पाण्याची फवारणी, स्वच्छता मोहिमा आणि धुलीकण नियंत्रण उपाययोजना नियमितपणे राबविण्यात येतील, असे पालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in