
ठाणे : विधानसभा निवडणुकीत मनसेच्या सर्वच उमेदवारांचा पराभव झाल्याने मनसेचे सर्वच पदाधिकारी व्यथित झाले असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे. त्यातच मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लेखी पत्र देत आपण जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले.
ठाणे विधानसभा मतदारसंघातून अविनाश जाधव हे मनसेचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात होते. त्यांच्या विरोधात महायुतीकडून संजय केळकर, महाविकास आघाडीकडून राजन विचारे लढत होती. मात्र संजय केळकर यांचा मोठ्या मतांनी विजय झाला तर राजन विचारे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. अविनाश जाधव यांना तिसऱ्या स्थानावर पराभव स्वीकारावा लागला. सदर निकालाबाबत महाविकास आघाडी आणि मनसेकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात आहे. मात्र जनतेने संजय केळकर यांना तिसऱ्यांदा विजयी करत संधी दिली आहे. महायुतीच्या राज्यातील अनेका उमेदवारांना घवघवीत यश मिळाले आहे. तर महाराष्ट्रात मनसेचा एकही उमेदवार निवडून न आल्याने विरोधकांकडून सर्वत्र ईव्हीएमवरच संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान रविवारी मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.