

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कर्करोगाचे लवकर निदान करून नागरिकांना त्वरित उपचाराकडे प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेला फिरती कर्करोग डायग्नोस्टिक व्हॅन हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरत आहे. ३ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत विविध तालुक्यांमध्ये फिरणाऱ्या या व्हॅनला आतापर्यंत स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
हा उपक्रम जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून, ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्य नागरिकांना कर्करोग तपासणी मोफत आणि सुलभपद्धतीने उपलब्ध करून देणे, हा मुख्य उद्देश आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे वेळेत निदान होणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. सध्या व्हॅन नियोजित कार्यक्रमानुसार कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर अशा तालुक्यांमध्ये फेरफटका मारत आहे. स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये, आशा सेविका, वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी यांच्या समन्वयातून जनजागृती केली जात असून, नागरिकांना तपासणीच्या तारीख आणि ठिकाणांची माहिती वेळोवेळी दिली जात आहे. यामुळे लोकसहभागात मोठी वाढ दिसून येत आहे.
आधुनिक वैद्यकीय उपकरणे
या व्हॅनद्वारे मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग यांसारख्या प्रमुख कर्करोगांची प्राथमिक तपासणी केली जात आहे. व्हॅनमध्ये आधुनिक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध असून प्रशिक्षित वैद्यकीय तज्ज्ञांची टीम या तपासण्या करत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली. कर्करोगाचे निदान प्राथमिक अवस्थेत झाले तर उपचार पूर्णतः यशस्वी ठरू शकतात, यावर त्यांनी भर दिला.
आरोग्य विभागाचे आवाहन
या मोहिमेत आतापर्यंत २,९७५ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये २८ संशयित रुग्ण आढळून आले आहे. संशयित रुग्णांना पुढील तपासणी आणि उपचारासाठी संबंधित वैद्यकीय संस्थांकडे तत्काळ पाठविण्यात आले आहे. कर्करोगाचे वेळीच निदान झाल्यास उपचार पूर्णपणे यशस्वी होतात. नागरिकांनी या मोफत तपासणी उपक्रमाचा लाभ मोठ्या प्रमाणावर घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.