

ठाणे : महाराष्ट्राच्या नर्सिंग शिक्षण क्षेत्रात ठाणे जिल्ह्याने महत्त्वपूर्ण कामगिरी नोंदवली आहे. राज्यातील पहिले शासकीय एम.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या परिसरात सुरू झाले आहे. महाविद्यालयाला मान्यता मिळाल्यानंतर पहिल्या शैक्षणिक सत्रासाठी विद्यार्थ्यांचे प्रवेशही पूर्ण झाले आहेत. लवकरच नियमित वर्ग सुरू होणार असल्याची माहिती उपसंचालक (मुंबई मंडळ, ठाणे) डॉ. कैलास पवार यांनी दिली. त्यामुळे राज्यातील नर्सिंग शिक्षणाला पदव्युत्तर स्तरावर नवी दिशा मिळणार आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुढाकारातून या महाविद्यालयाची उभारणी करण्यात आली आहे. महाविद्यालयासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, प्रशासकीय तयारी आणि शैक्षणिक बाबींची पूर्तता करण्यासाठी ठाण्याचे उपसंचालक डॉ. कैलास पवार यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक सुविधांची पूर्तता करण्यात आली. या प्रक्रियेत प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळिक यांनीही महत्त्वपूर्ण सहकार्य केले.
राज्यात दर्जेदार नर्सिंग शिक्षणाचा विस्तार करण्यासह पदव्युत्तर शिक्षण आणि विविध विशेष अभ्यासक्रम जिल्हास्तरावर उपलब्ध करून देण्याचा सार्वजनिक आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे. उच्चशिक्षित आणि प्रशिक्षित नर्सिंग मनुष्यबळ तयार झाल्यास शासकीय रुग्णालयांमधील आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि रुग्णकेंद्रित होण्यास मदत होणार आहे.
ठाणे जिल्ह्यात यापूर्वीपासून जीएनएम, एएनएम, एलएचव्ही आणि मानसोपचार परिचर्या पदविका असे विविध अभ्यासक्रम सुरू आहेत. तसेच बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमालाही मान्यता मिळाली आहे. त्यामुळे नर्सिंग शिक्षणाच्या क्षेत्रात ठाण्याची व्याप्ती वाढत आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांना ठाण्यातच संधी
ठाण्यात नव्याने उभारण्यात येत असलेल्या ९०० खाटांच्या अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी सिव्हिल हॉस्पिटलमुळे या क्षेत्रातील शैक्षणिक आणि आरोग्यविषयक सुविधांना आणखी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. शासकीय एम.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय सुरू झाल्याने पदव्युत्तर शिक्षणासाठी राज्यातील विद्यार्थ्यांना ठाण्यातच संधी उपलब्ध झाली आहे. यामुळे ठाणे हे नर्सिंग शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होण्यास मदत होणार असून, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेलाही प्रशिक्षित मनुष्यबळाचा लाभ मिळणार आहे.