महापालिका आयुक्त लागले कामाला; नालेसफाईची कामे १५ एप्रिलपासून सुरू करावीत

नालेसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण करून १५ एप्रिलपासून महापालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत दिले. त्याचबरोबर, अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या.
महापालिका आयुक्त लागले कामाला; नालेसफाईची कामे १५ एप्रिलपासून सुरू करावीत

ठाणे : मागील आठवड्यात शेवटच्या दिवशी पदभार स्वीकारल्यानंतर ठाणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त सौरभ राव हे कामाला लागले आहेत. त्यांनी पालिकेत विविध विभागांचा आढावा घेताना अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले.

नालेसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण करून १५ एप्रिलपासून महापालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत दिले. त्याचबरोबर, अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या.

मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी सायंकाळी महापालिका आयुक्तांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीस संदीप माळवी (अतिरिक्त आयुक्त १), प्रशांत रोडे (अतिरिक्त आयुक्त २), प्रशांत सोनाग्रा (नगर अभियंता) सर्व उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) जी. जी. गोदेपुरे यांनी मान्सूनच्या काळात महापालिकेच्या विविध विभागांवर असलेल्या जबाबदाऱ्या, त्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था याबद्दल सादरीकरण केले.

या बैठकीत, नालेसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्याबद्दल उचित कार्यवाही करून ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. तसेच, १५ एप्रिलपासून नालेसफाई प्रत्यक्षात सुरू केली जावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले.

शहरातील साफसफाई, कचरा व्यवस्थापन याबाबत देखील त्यांनी माहिती घेतली. आरोग्य विभागाबाबत तसेच अतिक्रमणाबाबत आयुक्तांनी गांभीर्याने चर्चा केली. आरोग्य सेवा कशी सुदृढ होईल याबाबत अधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. अनधिकृत बांधकामांबाबत महापालिका कशा प्रकारे कारवाई करते? किती एमआरटीपीचे गुन्हे दाखल करण्यात आले? सध्या अनधिकृत बांधकामाची स्थिती काय आहे? याबाबतची माहिती घेऊन आचारसंहिता काळात अनधिकृत बांधकाम होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना देखील आयुक्त राव यांनी दिली.

वंदना एसटी स्टॅण्डसारख्या सखल भागात पाणी साचू नये, त्याचा जलद निचरा व्हावा यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत, याची माहितीही या बैठकीत आयुक्तांनी घेतली. मान्सूनच्या काळात सर्व प्रमुख अधिकारी, आपत्कालीन सेवेत ज्यांच्यावर जबाबदारी आहे, असे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे मोबाईल कायम संपर्क क्षेत्रात राहतील आणि त्यावर तत्काळ प्रतिसाद दिला जाईल, याची दक्षता घेण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या अद्ययावत डाटा सेंटरलाही आयुक्तांनी भेट दिली.

त्यामुळे त्याचा वापर वाढवून कोणत्याही आप्तकालीन परिस्थितीचा अर्लट त्यांच्याकडून आपत्ती व्यवस्थापन केंद्राला जलद मिळावा, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या या वेळी दिल्या.

धोकादायक इमारतींबाबत जनजागृती करावी

महापालिका क्षेत्रातील ८६ अती धोकादायक इमारतींचा तातडीने आढावा घेण्यात यावा, असेही राव यांनी स्पष्ट केले. इमारत अतिधोकादायक असल्याबद्दल काही वाद असतील आणि त्यात त्रयस्थ संस्थेकडून लेखापरीक्षण करून घेण्यात येणार असेल तर तेही लगेच केले जावे, त्याच्या अहवालाचा पाठपुरावा करावा. अति धोकादायक इमारतीत रहिवासी राहत असतील तर त्या इमारती रिकाम्या करण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करावेत. माणुसकीचा दृष्टिकोन ठेवून प्रत्येक इमारतीसाठी स्वतंत्र उपाययोजना करावी, असेही राव यांनी सांगितले. अति धोकादायक इमारतींबाबत जनजागृती करावी, इमारत जीर्ण होत असेल तर त्यात कोणकोणती लक्षणे दिसतात, याचीही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात यावी, अशी सूचनाही आयुक्त राव यांनी केली. हाजुरी येथील टीडीआरएफच्या शिबिरालाही आयुक्त यांनी भेट दिली. विविध मोहिमांमध्ये या कृती दलाला आलेला अनुभवही त्यांनी जाणून घेतला.

आपत्कालीन कक्षाला भेट

ठाणे महापालिका मुख्यालयालगत असलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला आयुक्त राव यांनी भेट दिली. नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी, माहिती त्यांना दिला जाणारा प्रतिसाद याची माहिती त्यांनी घेतली. मान्सूनच्या चार महिन्यांच्या काळात महावितरण आणि पोलीस यांचे सक्षम समन्वयक आपत्कालीन कक्षात असावेत, असे आयुक्त राव म्हणाले. त्यासाठी संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिली. उत्तम समन्वयामुळे जलद प्रतिसाद मिळून आपत्तीची तिव्रता कमी होते, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.

विभागाच्या प्रमुखांशी चर्चा

आर्थिक डबघाईला आलेल्या महापालिकेची स्थिती सुधारण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी प्रदीर्घ चर्चा केली. शहरातील आरोग्य, अतिक्रमण आणि साफसफाई याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. महापालिकेच्या सद्यस्थितीबाबत माहिती घेताना त्यांनी लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर प्रदीर्घ चर्चा केली. आर्थिक स्थिती कशी आहे, मागील किती देणी आहेत, महापालिकेच्या तिजोरीत किती निधी आहे, या वर्षाची देयके कशी दिली जाणार आहेत, आगामी वर्षात आर्थिक स्रोत कसा उभा करायचा? मुख्यमंत्री विशेष खासदार आमदार निधीची कामे झाली का? त्याची ठेकेदारांची बिले देण्यात आली का, याबाबत सविस्तर माहिती आयुक्त राव यांनी जाणून घेतली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in