
ठाणे : बांधकामांच्या ठिकाणी होणारे हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी ठाणे महापालिका पुन्हा अलर्ट मोडवर आली आहे. मागील वर्षी काही बांधकाम व्यावसायिकांनी हवा प्रदूषण नियंत्रणाचे नियम पाळले नव्हते. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाने त्यांना कामे थांबवण्याचे आदेश दिले होते. यंदाही १५ सप्टेंबरपासून पालिका पुन्हा अलर्ट मोडवर येणार असल्यामुळे शहरातील सर्व बांधकामस्थळांची तपासणी सुरू होणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई होईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ठाणे महापालिकेला हवेची गुणवत्ता राखण्यासाठी २९ मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक आहे.
सध्या ठाणे शहरात सुमारे ३९० ठिकाणी बांधकाम सुरू आहे. अनेकदा निवासी व व्यावसायिक प्रकल्पांदरम्यान नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे, ज्यामुळे शहरातील हवा प्रदूषित होते. मागील डिसेंबर व जानेवारी महिन्यात ठाण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक वाढल्याचे अनुभवास आले होते. महापालिकेने यापूर्वीच काही कडक नियमांची अंमलबजावणी केली आहे. यात प्रत्येक बांधकामस्थळी पत्र्याची भिंत उभारणे, जाळीचे आवरण बसविणे, बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या वाहनांची चाके स्वच्छ करूनच बाहेर सोडणे, बांधकामस्थळी सातत्याने पाण्याची फवारणी करणे आणि संबंधित क्षेत्रात हवा प्रदूषण मोजणी यंत्रे बसविणे यांचा समावेश आहे.
मान्सून आता अंतिम टप्प्यात असल्याने पाऊस थांबल्यानंतर जमिनीवरील धूळ उडून हवेचे प्रदूषण वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका बांधकामस्थळांची प्रत्यक्ष पाहणी करून नियमांचे काटेकोर पालन होते की नाही, याची खात्री करणार आहे. नियम मोडल्यास नोटीस बजावून कठोर कारवाई केली जाईल.
मनीषा प्रधान, अधिकारी नियंत्रण प्रदूषण