
ठाणे : राज्यात सर्वत्र पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत जनजागृती वाढत आहे. पर्यावरण रक्षणासाठी उचलण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे. पर्यावरणप्रेमींनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले आहे. मात्र कृत्रिम तलाव ही अभिनव संकल्पना राबविणारी ठाणे महापालिका ही पहिली महापालिका आहे.
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी गणेशमूर्तीचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर ठाणे महापालिकेच्या या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. न्यायालयाने निकाल दिल्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी कृत्रिम तलावांची मोठ्या प्रमाणात उभारणी केली. मात्र, गेल्या २० वर्षांपासून ठाणे महापालिका कृत्रिम तलावांची संकल्पना राबवित असून, कृत्रिम तलाव उभारणी संकल्पनेची जनक ठाणे महापालिका आहे. तलावांचे प्रदूषण रोखले तरच तलाव संवर्धनासाठी निधी मिळेल, अशी अट केंद्र आणि राज्य सरकारने घातली होती. त्याची पूर्तता करण्यासाठी महापालिकेने ही संकल्पना राबविली आणि त्यास ठाणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) तज्ज्ञ समितीच्या शिफारशींनंतर पीओपी मूर्तीच्या खरेदी-विक्रीवरील बंदी न्यायालयाने उठवली होती. परंतु समुद्र आणि इतर नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये पीओपी मूर्ती विसर्जनाला परवानगी देणार नसल्याचे स्पष्ट करत धोरण आखण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले. त्यानंतर राज्य सरकारने न्यायालयात धोरण सादर केले. यानंतर सहा फुटांपर्यंतच्या पीओपी गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावांतच करावे, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले. या आदेशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उभारले आहेत. या कृत्रिम तलावांच्या ठिकाणी निर्माल्य कलश, वैद्यकीय पथक, अग्निशमन दल, प्रखर विद्युत व्यवस्था आणि ध्वनिक्षेपण यंत्रणा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
नागरिकांकडून चांगला प्रतिसाद
ठाणे शहराला 'तलावांचे शहर' म्हणून ओळखले जाते. या शहरात ३७ हून अधिक तलाव आहेत. या तलावांचे प्रदूषण रोखण्यासाठी २००५ मध्ये तत्कालीन आयुक्त संजय सेठी यांनी कृत्रिम तलाव संकल्पना राबविण्यास सुरुवात केली. या संकल्पनेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्यामुळे कृत्रिम तलाव निर्मितीची जनक ही ठाणे महापालिका असून, ही संकल्पना आसपासच्या महापालिकांकडूनही काही वर्षांपासून राबविली जात आहे.
कृत्रिम तलाव कुठे?
मासुंदा तलाव, खारेगाव तलाव, न्यू शिवाजी नगर, ऋतुपार्क, खिडकाळी तलाव, दातीवली तलाव, वागळे इस्टेट परिसरातील रायलादेवी तलाव नं. १, रायलादेवी तलाव नं. २, उपवन येथील पालायदेवी मंदिर, निळकंठ वुड्स उपवन तलाव या ठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहेत.