
ठाणे : घोडबंदर मार्गावरील सेवा रस्त्यांचा समावेश महामार्गामध्ये करण्यासाठी दीड हजारांपेक्षा अधिक झाडांची कत्तल केली जाणार आहे. तर दुसरीकडे विविध विकास प्रकल्पासाठी आतापर्यंत शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील हरित क्षेत्र झपाट्याने कमी होत असून उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. यासाठी आता जाळीच्या आच्छादनाचा नवीन प्रयोग महापालिकेने सुरू केला आहे. झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल झाल्याने निर्माण झालेले दुष्परिणाम कमी करण्यासाठी पालिकेकडून ही शक्कल लढवण्यात येत आहे.
हा प्रयोग चांगला असला तरी, दुसरीकडे सेवा रस्त्यांचा समावेश महामार्गात करण्यासाठी दीड हजारांपेक्षा अधिक झाडांचा बळी दिला जाणार आहे. ठाणे महापालिकेच्या वतीने झाडे तोडण्याची ही मोहीम देखील सुरू करण्यात आली आहे. कापूरबावडी ते गायमुख या सेवा मार्गावर येणाऱ्या झाडांची कत्तल करण्यात येत असल्याने महामार्गाच्या कडेला बससाठी उभे राहणे, देखील उन्हामुळे नागरिकांना कठीण झाले आहे. वेगवेगळ्या विकासकांचा प्रस्ताव आला की सर्रासपणे झाडांची कत्तल करण्यासाठी पालिकेकडून परवानगी दिली जाते.
ठाणे महापालिकेने स्वतःहून निर्माण केलेले हे दुष्परिणाम कमी करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
पालिकेचा वाहनचालकांना दिलासा
सध्या तीव्र उन्हाळा सुरू असल्याने वाहनचालकांना सिग्नलच्या प्रतीक्षेत उभे असताना उन्हाचा त्रास जाणवू नये, म्हणून ठाणे महानगरपालिकेतर्फे प्रायोगिक तत्त्वावर गोखले रोडवरून तीन हात नाक्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर जाळीचे आच्छादन टाकण्यात आले आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गोखले रोडवरील ही जाळी १०० फूट लांब, २५ फूट रुंद असून तिची उंची रस्त्यापासून २० फूट एवढी आहे. आणखी काही ठिकाणी अशाप्रकारे जाळी उभारण्याचा ठाणे महानगरपालिकेचा मानस आहे.