ठाणे महापालिकेत 'त्या' कर्मचाऱ्यांची 'जॉईनिंग'साठी झुंबड

ठाणे महानगरपालिका निवडणूक कामकाजासाठी नियुक्ती होऊनही प्रशिक्षणास दांडी मारणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. प्रशासनाने या 'दांडीबहाद्दरां'वर कडक शिस्तभंगविषयक कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा देताच, गुरुवारी ठाणे महापालिका मुख्यालयात कर्तव्यावर हजर असल्याचे पत्र (जॉईनिंग लेटर) मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.
ठाणे महापालिकेत 'त्या' कर्मचाऱ्यांची 'जॉईनिंग'साठी झुंबड
छायाचित्र : दीपक कुरकुंडे
Published on

ठाणे : ठाणे महानगरपालिका निवडणूक कामकाजासाठी नियुक्ती होऊनही प्रशिक्षणास दांडी मारणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. प्रशासनाने या 'दांडीबहाद्दरां'वर कडक शिस्तभंगविषयक कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा देताच, गुरुवारी ठाणे महापालिका मुख्यालयात कर्तव्यावर हजर असल्याचे पत्र (जॉईनिंग लेटर) मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांसाठी आयोजित विशेष प्रशिक्षण शिबिरांना अनेकांनी दांडी मारल्याचे समोर आले होते. निवडणुकीसारख्या महत्त्वाच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, निलंबनासह कडक कारवाईचे संकेत दिले होते. या इशाऱ्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली.

छायाचित्र : दीपक कुरकुंडे

पालिका मुख्यालयात कर्मचाऱ्यांचा राबता

कारवाईच्या भीतीने धास्तावलेल्या कर्मचाऱ्यांनी सकाळपासूनच महापालिका मुख्यालयात धाव घेतली. जॉईनिंग लेटर वेळेत सादर करून कारवाई टाळण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या. प्रशासकीय विभाग आणि निवडणूक कक्षाबाहेर झालेल्या गर्दीमुळे दिवसभर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

निवडणूक कर्तव्यावर हजर न झालेल्यांवर होणार गुन्हे दाखल!

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ सुरळीतपणे व पारदर्शकरीतीने पार पडावी, या दृष्टिकोनातून महापालिका प्रशासनाने निवडणूक कामी अनेक अधिकारी/कर्मचाऱ्यांची, शिक्षक वर्गाची नेमणूक केली आहे. निवडणुकीचे तातडीचे व महत्त्वाचे कामकाज विहित कालमर्यादित करणे गरजेचे आहे, असे असतानाही निवडणुकीचे आदेश बजावूनही काही शिक्षकवर्ग निवडणूक कर्तव्यावर हजर झालेला नव्हता, अशाप्रकारे निवडणूक कर्तव्यावर हजर न झालेल्या शिक्षक वर्गांच्या शाळांना महापालिकेचे प्रशासनाधिकारी भारत बोरनारे यांनी पोलीस पथकासह समक्ष भेट देऊन संबंधित शिक्षक वर्गापुढे निवडणुकीच्या कामकाजाचे महत्त्व अधोरेखित केले आणि त्यांना निवडणुकीकामी हजर होण्याबाबत समज दिली. परिणामी संबंधित शाळांमधील सुमारे २९ शिक्षक वर्ग निवडणूक कर्तव्यावर हजर झाले आहेत.

छायाचित्र : दीपक कुरकुंडे

राखीव कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण दिनांक ५ जानेवारी रोजी असून मतदान अधिकारी/कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण दिनांक ७जानेवारीपासून होणार आहे. निवडणूक कर्तव्यावर हजर न झालेल्या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.

वंदना गुळवे, उपायुक्त महापालिका केडीएमसी

logo
marathi.freepressjournal.in