

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याची विकेंद्रित पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी उभारलेल्या बायोमिथेननायझेशन, बायो कंपोस्टिंग आणि मॅकेनिकल कंपोस्टिंग प्रकल्पांच्या परिचालन, निगा व देखभालीसाठी विद्यमान कंत्राटदारांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेसमोर ठेवला आहे. या मुदतवाढीसाठी सुमारे १ कोटी १८ लाख रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित आहे.
महापालिका क्षेत्रात १ ते ५ टन क्षमतेचे बायोमिथेननायझेशन, बायो कंपोस्टिंग आणि मॅकेनिकल कंपोस्टिंग प्रकल्प ई-टेंडर प्रक्रियेद्वारे उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पांचे उभारणी, परिचालन, निगा व देखभाल पाच वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात आली होती. संबंधित निविदांना २०१७ व २०१८ मध्ये आयुक्त तसेच महासभेची मान्यता मिळाली होती.
दरम्यान, काही प्रकल्पांच्या देखभाल कराराचा कालावधी ३० सप्टेंबर २०२५ रोजी संपुष्टात आला आहे. नवीन निविदा प्रक्रिया सुरू असली तरी ती पूर्ण होण्यासाठी कालावधी लागणार असल्याने विद्यमान कंत्राटदारांना तीन महिन्यांच्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे.
यानुसार हिरानंदानी येथील बायोमिथेननायझेशन प्रकल्पाच्या देखभालीसाठी मे. एनप्रोटेक सोल्युशन्स या संस्थेला तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात येणार असून त्यासाठी सुमारे ८ लाख ४४ हजार २०० रुपये खर्च अपेक्षित आहे.
तसेच चार बायो कंपोस्टिंग प्रकल्पांच्या परिचालन व देखभालीसाठी मे. अमृत एंटरप्रायझेस या संस्थेला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी सुमारे ५२ लाख ९२ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.
याशिवाय दोन मॅकेनिकल कंपोस्टिंग प्रकल्प मे. अमृत एंटरप्रायझेस आणि दोन प्रकल्प मे. अर्थकेअर इक्विपमेंट प्रा. लि. यांच्यामार्फत चालविले जात असून या चार प्रकल्पांच्या देखभालीसाठी तीन महिन्यांसाठी सुमारे ५६ लाख ७७ हजार ६०८ रुपये खर्च अपेक्षित आहे.
या सर्व प्रकल्पांच्या देखभालीसाठी होणारा खर्च ‘घनकचरा प्रकल्पाची निगा व देखभाल’ या लेखाशिर्षातून करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र संबंधित लेखाशिर्षात पुरेशी आर्थिक तरतूद उपलब्ध नसल्याने हा खर्च करण्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ७२ (ब) अंतर्गत महासभेची मान्यता घेण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे.