ठाणे : कचरा संकलन यंत्रणा होणार अत्याधुनिक; १० वर्षांसाठी १००० कोटींचा निधी खर्च करण्याची तयारी

झपाट्याने होत असलेले शहरीकरण, शहरात वाढणारे उद्योगधंदे, आयटी हब, मॉल्स, अशा विकासकामांमुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये दैनंदिन सुमारे ३ ते ४ लाख नागरिक बाहेरून ये-जा करीत असतात.
ठाणे : कचरा संकलन यंत्रणा होणार अत्याधुनिक; १० वर्षांसाठी १००० कोटींचा निधी खर्च करण्याची तयारी
(प्रातिनिधिक छायाचित्र)

ठाणे : झपाट्याने होत असलेले शहरीकरण, शहरात वाढणारे उद्योगधंदे, आयटी हब, मॉल्स, अशा विकासकामांमुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये दैनंदिन सुमारे ३ ते ४ लाख नागरिक बाहेरून ये-जा करीत असतात. सद्यस्थितीत ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये दैनंदिन सुमारे १०५० मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होत असून झोपडपट्टी भागातही मोठ्या प्रमाणात ओला आणि सुक्या कचऱ्याची निर्मिती होत आहे. महापालिकेच्या वतीने याच कामासाठी १० वर्षे कालावधीसाठी १००० कोटींचा निधी खर्च करण्याची तयारी दर्शवली असून यासंदर्भातील सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याचा पालिका प्रशासनाच्या वतीने निर्णय घेण्यात आला आहे.

शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे संकलन आणि तसेच वाहतूक करण्यासाठी सध्या घंटागाड्यांची योजना पालिकेच्या वतीने राबवण्यात येत आहे. मात्र ही यंत्रणा अपुरी आणि सक्षम नसल्याने आता अत्याधुनिक आणि नव्याने यंत्रणा निर्माण करण्याचा ठाणे महापालिकेच्या वतीने निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत शहरामध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे संकलन करण्यासाठी मे.रिजनल सेंटर फॉर अर्बन अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज, ऑल इंडिया लोकल सेल्फ गर्व्हमेंट यांनी दिलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार कचऱ्याच्या वजनानुसार प्रति मेट्रिक टन दर निश्चित करून शहरातील हरित कचऱ्यासह संपूर्ण कचरा संकलन तसेच कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी ७ वर्षे कालावधीसाठी रक्कम ७६३ कोटींचा खर्च आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते.

या सर्वेक्षणानंतर कचरा संकलन तसेच वाहतूक करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार दीर्घकालीन उपाययोजना म्हणून किमान १० वर्षे कालावधीची निविदा मागण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. ७ वर्षे कालावधीसाठी साधारणत: ७०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार १० वर्षे कालावधीसाठी १००० कोटींचा खर्च गृहीत धरून नवीन सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सल्लागारापोटी प्रकल्प खर्चाच्या ०.२५% इतका खर्च अपेक्षित असून हा खर्च २ कोटी ५० लाखांच्या घरात जातो. यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो मंजुरीसाठी आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे.

कचरा संकलन आणि वाहतुकीमधील सध्याच्या त्रुटी

- झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे कचऱ्यामध्ये दैनंदिन वाढ होत असून अस्तित्वातील घंटागाड्यांपेक्षा अधिक घंटागाड्यांची आवश्यकता आहे.

- घंटागाड्यांमध्ये कचरा संकलनाची अत्याधुनिक व्यवस्था नसल्यामुळे गोळा केलेला कचरा मनुष्यबळाद्वारे घंटागाडीमध्ये भरावा लागतो.

- शहरातील झोपडपट्टी भागातून गोळा होणारा कचरा एकत्रित करून पुन्हा घंटागाडीमध्ये हस्तांतरित करण्यासाठी मनुष्यबळाचा व वेळेचा अपव्यव होत आहे.

- सद्यस्थितीत लहान आकाराच्या तसेच मोठ्या सहाचाकी अशा सर्वच घंटागाड्या संकलित केलेला कचरा डम्पिंगच्या ठिकाणी घेऊन जात असताना वाहतूककोंडी होते.

- सार्वजनिक रस्ते साफसफाईद्वारे रस्त्याच्या कडेला जमा होणाऱ्या कचऱ्याची वाहतूक करण्याकरिता स्वतंत्र व्यवस्था नसल्याने घरोघरी जाऊन कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्यांवरच अवलंबन रहावे लागते.

- शहरामधील हॉटेल, रेस्टॉरंट या ठिकाणी जमा होणाऱ्या टाकाऊ मांस, मच्छी, मटण यांचे संकलन करण्याकरिता स्वतंत्र वाहतूक व्यवस्था नसल्याने घंटागाड्यांवरच अवलंबून रहावे लागते.

- सद्यस्थितीत घंटागाडीद्वारे कचरा संकलन यंत्रणेमध्ये रस्त्यावरील बेवारस मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याची सोय उपलब्ध नाही.

- शहरात निर्माण होणारा हरित कचरा संकलन करण्यासाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था उपलब्ध नाही.

- संकलित झालेला कचरा वर्गीकरणानुसार वाहतूक करण्यासाठी घंटागाडीमध्ये पर्याप्त व्यवस्था नसल्याने वर्गीकरणाचे उद्दिष्ट सफल होत नाही.

logo
marathi.freepressjournal.in