ठाणे महापालिकेच्या मालमत्ता विभागाचे उद्दिष्ट थोडक्यात हुकले; ३१ मार्चपर्यंत ९४ टक्के कराची वसुली

ठाणे महापालिकेतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर जवळ जवळ सर्व विभागातील ८० टक्के कर्मचारी, अधिकारी हे लोकसभा निवडणुकीच्या कामाला जुंपले गेले आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम मालमत्ता करासह, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींसह इतर विभागांच्या उत्पन्नावर झाल्याचे दिसत आहे.
ठाणे महापालिकेच्या मालमत्ता विभागाचे उद्दिष्ट थोडक्यात हुकले; ३१ मार्चपर्यंत ९४ टक्के कराची वसुली

ठाणे : ठाणे महापालिकेला मालमत्ता करापोटी देण्यात आलेले ७६१.७२ कोटींचे उद्दिष्ट थोडक्यात हुकले असून, ३१ मार्च या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी मालमत्ता करापोटी ठाणे महापालिकेच्या तिजोरीत ७०३.९३ कोटी रुपये जमा झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक वसुली ही माजिवडा मानपाडा आणि वर्तक नगर प्रभाग समितीमध्ये करण्यात आली असून, सर्वाधिक कमी वसुलीही कळवा, मुंब्रा आणि वागळे पट्यात झाली असल्याचे उघड झाले आहे.

ठाणे महापालिकेतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर जवळ जवळ सर्व विभागातील ८० टक्के कर्मचारी, अधिकारी हे लोकसभा निवडणुकीच्या कामाला जुंपले गेले आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम मालमत्ता करासह, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींसह इतर विभागांच्या उत्पन्नावर झाल्याचे दिसत आहे. ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती कोरोनामुळे कोलमडून पडली आहे. ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाला सुरुवातीला ७६१.७२ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ते सुधारित करून ७३८.७१ कोटींचे करण्यात आले. त्यानुसार शनिवारपर्यंत ५६९ कोटींपर्यंतची वसुली होती. ही वसुली ७० टक्क्यांच्या घरात होती. त्यामुळे एका दिवसात २१ टक्के वसुली करण्याचे आव्हान ठाणे महापालिकेच्या मालमत्ता विभागावर होते.

ठाणे महापालिकेने मालमत्ता वसुलीसाठी शर्तीचे प्रयत्न केले असून, ३१ मार्चपर्यंत ठाणे महापालिकेने ९४ टक्के वसुली केली असून उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मालमत्ता विभागाची वसुली केवळ ६ टक्क्यांनी हुकली आहे. काही प्रमाणात मालमत्ता विभागाचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही, तर शहर विकास विभागाने मात्र ठाणे महापालिकेला तारले आहे. शहर विकास विभागाला ५६५ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु सुधारित करून वाढविण्यात आले. त्यानुसार आता या विभागाला ६६२.८६ कोटींचे सुधारित उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु सुधारित उद्दिष्टापेक्षाही अधिक म्हणजेच ७४२ कोटींचे उत्पन्न या विभागाने यंदा प्राप्त केले आहे. ११२ टक्के वसुली या विभागाने केली आहे.

एक रात्रीत ५० लाख!

मालमत्ता वसुलीचे उद्दिष्ट गाठत असताना या विभागाने ऑनलाईन कर भरण्यावरही भर दिला होता. परिणामी ३१ मार्च या एका रात्रीत तब्बल ५० लाखांचा मालमत्ता कर भरणा हा नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने केल्याची माहिती पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.

ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थती सुधारण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये ज्या मालमत्तांचे मूल्यांकन झालेले नाही त्यांचे मूल्यांकन कोणत्याही प्रकारचा कर न वाढवता करण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.

- सौरभ राव, आयुक्त, ठाणे महापालिका

logo
marathi.freepressjournal.in