

ठाणे : ठाणे महापालिका मुख्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर सुरक्षेच्या उपाययोजना कडक करण्याचा निर्णय घेणाऱ्या प्रशासनाचा दुहेरी निकष अवघ्या दुसऱ्याच दिवशी समोर आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सर्वसामान्य नागरिकांना मुख्यालयात प्रवेश नाकारला जात असताना महापालिकेतील सत्ताधारी नगरसेवक आणि त्यांच्या समर्थकांना मात्र बिनदिक्कत प्रवेश दिला जात असल्याचे चित्र शुक्रवारी पाहायला मिळाले. या विरोधाभासी भूमिकेमुळे महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ठाणे महापालिका मुख्यालयात गुरुवारी संशयास्पद वस्तू ठेवल्याचा धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याने प्रशासनासह पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. बॉम्बशोधक व नाशक पथकाने मुख्यालयाची तपासणी केली. त्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र अनिवार्य करणे, वाहनांच्या प्रवेशावर नियंत्रण ठेवणे आणि अभ्यागतांच्या बॅगांची तपासणी करणे, अशा सूचना परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या.
शुक्रवारी सकाळपासून या नियमांची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र, सुरक्षेच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना मुख्य प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले. विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना दुसऱ्या प्रवेशद्वाराकडे जाण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. पत्रकारांनाही प्रवेशासाठी अडवण्यात आले. नागरिकांनी कामाचे कारण सांगूनही सुरक्षारक्षकांनी वरिष्ठांच्या आदेशाचा हवाला देत प्रवेश नाकारला.
दुसरीकडे, सत्ताधारी नगरसेवकांच्या वाहनांना आणि त्यांच्यासोबत आलेल्या समर्थकांना मुख्य प्रवेशद्वारातून सहज प्रवेश दिला जात होता. त्यामुळे राजकीय पदाधिकारी आणि त्यांच्या समर्थकांसाठी वेगळे सुरक्षा निकष लावले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यालयातील संभाव्य धोका सर्वांसाठी समान असताना समर्थकांना कोणत्या आधारावर प्रवेशाची सूट दिली जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. यासंदर्भात महापालिकेचे उपायुक्त गजानन गोदेपुरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
काही ठिकाणी शाब्दिक चकमकी
प्रवेश नाकारल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली. काही नागरिकांनी सुरक्षारक्षकांना जाब विचारत वरिष्ठांशी बोलण्याची मागणी केली. मात्र, आदेशाचे पालन करणे बंधनकारक असल्याचे सांगत सुरक्षारक्षकांनी प्रवेश नाकारला. त्यामुळे काही ठिकाणी शाब्दिक चकमकी झाल्या. विशेष म्हणजे, काही नागरिकांना आज नियमांचे पालन करा, उद्यापासून प्रवेश दिला जाईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे सुरक्षा नियमांबाबत प्रशासनातच स्पष्टता नसल्याचे दिसून आले.
प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
महापालिका मुख्यालयाच्या सुरक्षेसाठी प्रवेशावर निर्बंध घालणे आवश्यक असले, तरी त्यांची अंमलबजावणी सर्वांसाठी समान असणे अपेक्षित आहे. अधिकारी-कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी ओळखपत्र व तपासणीचे नियम लागू असताना सत्ताधारी नगरसेवकांच्या समर्थकांना मोकळीक कशासाठी, हा प्रश्न अनुत्तरित आहे. धमकीच्या घटनेनंतर सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याऐवजी प्रवेशद्वारावरच दुहेरी निकष राबवले जात असल्याने महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.