

ठाणे : शहरात थंडीचा कडाका वाढू लागल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटविल्या जात आहेत. मात्र, थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटी पेटविताना लाकडांऐवजी प्लास्टिक, पाला-पाचोळा आणि रस्त्यावरील कचरा जाळणाऱ्यांना आता चांगलेच महागात पडणार आहे. उघड्यावर कचरा जाळून वायुप्रदूषण करणाऱ्यांविरोधात ठाणे महापालिकेने कठोर भूमिका घेतली असून, दोषींना थेट पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. या कारवाईसाठी महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने चार विशेष पथके तैनात केली आहेत.
गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात थंडीचा जोर वाढला आहे. शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता शहरात २१.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रात्रीच्या वेळी गारठा अधिक जाणवत असल्याने रस्त्यावरील नागरिक, सुरक्षारक्षक आणि अन्य कामगार शेकोट्यांचा आधार घेत आहेत. मात्र, या शेकोट्यांसाठी लाकडांऐवजी प्लास्टिक, कचरा आणि पाला-पाचोळा जाळला जात असल्याने हवेत विषारी धूर पसरत आहे. परिणामी, थंडीपासून बचाव करण्याच्या प्रयत्नात नागरिकांच्या आरोग्यालाच धोका निर्माण होत आहे. विशेषतः दमा आणि फुफ्फुसांच्या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना अशा धुराचा अधिक त्रास होतो. तसेच लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनाही श्वसनाचे विकार, खोकला आणि घशाच्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता असते. हवेतील प्रदूषणाची पातळी वाढू नये, यासाठी महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
चार विशेष पथके तैनात
शहरातील विविध भागांत चार विशेष वाणे पथके गस्त घालणार असून, उघड्यावर कचरा जाळताना कोणी आढळल्यास संबंधित व्यक्तीला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. प्रदूषण नियंत्रण विभागाच्या प्रमुख विद्या सावंत यांनीही याबाबत स्पष्ट केले आहे. त्यामुळे थंडीपासून बचावासाठी शेकोटी पेटविताना प्लास्टिक किंवा इतर कचरा जाळण्याचे प्रकार टाळावेत, अन्यथा आर्थिक दंडाला सामोरे जावे लागेल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.