
ठाणे : मान्सून काळात शहरात कोणत्याही प्रकारची आपत्ती निर्माण झाली तर त्याचा सामना करण्यासाठी महापालिका सज्ज झाली असून प्रत्येक प्रभाग समितीत १० जणांचे पथक २४ तास तैनात राहणार असून कळवा, मुंब्रा विभागासाठी विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे.
ठाणे महापालिका मान्सून काळात उद्भवणाऱ्या विविध आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यानुसार प्रत्येक प्रभाग समितीत १० जणांचे विशेष पथक २४ तास सज्ज ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कळवा, मुंब्रा, आणि दिवा विशेष जोखमीच्या परिसरात ३० जणांचे पथक उपलब्ध असणार आहेत.
मान्सूनच्या काळात ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळे आपत्तींचा सामना नागरिकांना करावा लागतो. रस्त्यावर पाणी साचणे झाड कोसळणे, वाहने बंद पडणे, भूसंकलन होणे, घर पडणे, पूरस्थिती निर्माण होणे आदींचा समावेश असतो. परिणामी
याकरिता महापालिकेने जर अशी परिस्थिती निर्माण झाल्यास तत्काळ मदत पोहचविणे शक्य व्हावे, याकरिता सज्ज राहण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक प्रभाग समितीत १० जणांचे अतिरिक्त मदत पथक मान्सूनकाळात सज्ज ठेवण्यात येणार आहे.
या पथकाच्या मदतीला जेसीबी, युटीलिटी व्हॅन यांचा समावेश असणार आहे. तसेच यामध्ये रोप, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, पहार, डोर,नायलॉन रोप, कुडळ,फावडे, आदी साहित्याचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर एखाद्या जखमी व्यक्तीला प्राथमिक उपचारासाठी आवश्यक असलेल्या औषधांचा साठा ही देण्यात येणार आहे.
पालिकेमार्फत हेल्पलाइन कार्यरत
ठाणे महापालिकेच्या ९ प्रभाग समितीपैकी कळवा, मुंब्रा, दिवा या तीन ठिकाणी अति जोखमीच्या परिसराचा समावेश आहे. कळवा परिसरात खाडीकिनारा आहे. तसेच कळवा, मुंब्रा येथे दरड प्रवणक्षेत्राचा समावेश आहे. तर दिवा परिसर हा पूर्णपणे खाडी परिसर येतो. परिणामी या तीन प्रभाग समिती क्षेत्रात विशेष अशी दक्षता महापालिकेच्या वतीने घेण्यात आली आहे. त्यानुसार या तीन ठिकाणी ३० जणांचे पथक कार्यरत असणार आहे. अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली. याच जोडीला ठाणे महापालिकेच्या मार्फत हेल्पलाइन देखील कार्यरत ठेवण्यात येणार आहे.
आयुक्तांचा बसमधून घोडबंदरचा दौरा
पावसाळ्यात घोडबंदर रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये, यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव विशेष प्रयत्नशील असून त्यांनी शुक्रवारी घोडबंदर रोड परिसरात पावसाळापूर्व पाहणी दौरा परिवहन सेवेच्या बसेसमधून केला.
घोडबंदर भागातील गायमुख घाट रस्त्याचे काम आता पुन्हा करण्यात येणार आहे. तीन दिवस येथील घाटाच्या पॅचिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. २५ ते २८ एप्रिल दरम्यान गायमुख घाटाच्या पॅचिंगचे काम हातात घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे माजिवडा पुलावर देखील पॅचवर्क करण्यात येणार आहे. पावसाळ्यात खड्डे पडणार नाहीत हा या मागचा हेतू असून गायमुख घाटाची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. कासारवडवली व भाईंदरपाडा येथील उड्डाणपुलाचे काम देखील प्रगतिपथावर सुरू आहे. हे दोन्ही उड्डाणपूल २० मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी संबंधितांना दिले.
पावसाळ्यात नागरिकांना त्रास होणार नाही, याची विशेष काळजी घेणार असून घोडबंदर रोडवर विविध कामे एकाचवेळी सुरू आहेत, त्यामुळे ही कामे प्रगतिपथावर सुरू असून ती लवकरच पूर्णत्वास जातील. नागरिकांनी देखील सहकार्य करून वाहतुकीचे नियम पाळावेत, मार्शलच्या सूचना ऐकाव्यात, विरुद्ध दिशेने वाहने चालवू नयेत, वाहतूककोंडी सोडविण्यासाठी सर्वच प्राधिकरण प्रयत्न करीत असून नागरिकांनी देखील सहकार्य करावे.
- सौरभ राव, आयुक्त महापालिका