ठाण्यातील टँकरना GPS यंत्रणा; टँकर माफियांच्या मनमानीला चाप, ऑनलाइन बुकिंगची सुविधा

पाणीटंचाईच्या काळात खासगी टँकरचालकांकडून होणारी नागरिकांची आर्थिक लूट रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलण्याची तयारी सुरू केली आहे. शहरात धावणाऱ्या टँकरना जीपीएस यंत्रणा बसविण्यात येणार असून, नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन टँकर बुकिंग करता येणार आहे.
ठाण्यातील टँकरना GPS यंत्रणा; टँकर माफियांच्या मनमानीला चाप, ऑनलाइन बुकिंगची सुविधा
ठाण्यातील टँकरना GPS यंत्रणा; टँकर माफियांच्या मनमानीला चाप, ऑनलाइन बुकिंगची सुविधा
Published on: 

ठाणे : पाणीटंचाईच्या काळात खासगी टँकरचालकांकडून होणारी नागरिकांची आर्थिक लूट रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलण्याची तयारी सुरू केली आहे. शहरात धावणाऱ्या टँकरना जीपीएस यंत्रणा बसविण्यात येणार असून, नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन टँकर बुकिंग करता येणार आहे. त्याचबरोबर टँकरचे दर निश्चित करून खासगी टँकरचालकांच्या मनमानीला आळा घालण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. यासंदर्भात बुधवारी झालेल्या बैठकीत चर्चा झाली असून, येत्या काही दिवसांत या व्यवस्थेची अंमलबजावणी करण्याचे प्रस्तावित आहे.

ठाणे शहरात पाणीटंचाईच्या काळात टँकरची मागणी वाढते. याच संधीचा फायदा घेत खासगी टँकरचालकांकडून अवाजवी दर आकारले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जातात. महापालिकेचे स्वतःचे सहा टँकर असून, कंत्राटी पद्धतीने आणखी २५ टँकर कार्यरत आहेत. याशिवाय शहरात सुमारे १५० खासगी टँकरचालक व्यवसाय करतात. मात्र, खासगी टँकरच्या व्यवहारांवर महापालिकेचे नियंत्रण नसल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

एल निनोच्या पार्श्वभूमीवर शहरात दर सोमवारी १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. पाणीकपात संपल्यानंतरही पाणीपुरवठा पूर्ववत होण्यासाठी एक ते दोन दिवसांचा कालावधी लागत असल्याने अनेक भागांतील गृहसंकुलांना टँकरवर अवलंबून राहावे लागते. महापालिकेच्या टँकरसाठी ७०० रुपये मोजावे लागत असताना खासगी टँकरचालकांकडून तीन ते साडेतीन हजार रुपये आकारले जात आहेत. तातडीने टँकर मागविल्यास हा दर चार हजार रुपयांपर्यंत पोहोचतो. घोडबंदर परिसरात स्थानिक पातळीवर टँकर उपलब्ध न झाल्यास मुंबईहून टँकर मागवावा लागतो. त्यासाठी तब्बल आठ हजार रुपये मोजावे लागत असल्याने नागरिकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे.

टँकरच्या नावाखाली सुरू असलेल्या या आर्थिक लुटीविरोधात कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन उपाययोजना करण्याची मागणी केली होती. आमदार संजय केळकर यांनीही या प्रश्नावर वारंवार आवाज उठविला होता. त्यानंतर प्रशासनाने टँकरच्या व्यवहारांवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत.

टँकरच्या प्रवासावर राहणार जीपीएसची नजर

शहरातील टँकरना जीपीएस यंत्रणा बसविल्यानंतर ते कुठून निघाले, कोणत्या मार्गाने गेले, कोणत्या गृहसंकुलात पोहोचले आणि पोहोचण्यासाठी किती वेळ लागला? याची माहिती महापालिका प्रशासनाला मिळणार आहे. त्यामुळे टँकरच्या फेऱ्या, त्यांच्या हालचाली आणि वापरावर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावर स्वतंत्र ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार करून नागरिकांना टँकर बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसित करण्याचेही नियोजन आहे.

टँकरचे दर निश्चित करण्याचे आव्हान

खासगी टँकरचालकांनाही या नव्या व्यवस्थेत सहभागी करून घेण्याचे नियोजन आहे. जीपीएस यंत्रणा, ऑनलाइन बुकिंग आणि दरनिश्चिती या उपाययोजनांमुळे टँकर व्यवसायातील मनमानीला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र, या व्यवस्थेची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी सुरू होणार आणि नागरिकांना रास्त दरात टँकर उपलब्ध होणार का, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)