

ठाणे : पावसाळ्याच्या सरींसोबत ठाणे शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून मुख्य रस्ते, पूल, चौक आणि प्रमुख वाहतूक मार्गांवरील खड्डे वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावण्यासोबतच अपघातांचा धोका वाढला आहे. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन ठाणे महापालिका प्रशासनाने आता मुख्य रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तब्बल दोन कोटी रुपयांचा खर्च करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.या कामासाठी ‘रस्ते दुरुस्ती (मुख्यालय)’ या लेखाशीर्षांतर्गत निधी खर्च करण्यास तसेच आगाऊ निविदा मागवण्यास सर्वसाधारण सभेची मंजुरी मागण्यात आली आहे.
नगर अभियंत्यांनी हा प्रस्ताव सादर केला असून मूळ प्रस्तावावर महापालिका आयुक्तांची स्वाक्षरी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ठाणे महापालिका हद्दीत सध्या एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि मेट्रो प्रकल्पामार्फत विविध विकासकामे सुरू आहेत. याशिवाय काही रस्ते व पूल संबंधित प्राधिकरणांकडून महापालिकेकडे हस्तांतरित झाले आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची जबाबदारी महापालिकेवर आली आहे. पावसाळ्यामुळे शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचे प्रशासनाच्या निदर्शनाला आले आहे.
विशेषतः मुख्य वाहतूक मार्गांवरील खड्ड्यांमुळे वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम होत असून, दुचाकीस्वारांच्या अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने प्रस्तावात नमूद केले आहे.
कलम ७२(ब) अन्वये दायित्व स्वीकारणारदोन कोटी रुपयांचा खर्च महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ७२(ब) अन्वये स्वीकारण्यास महासभेची मान्यता मागण्यात आली आहे तसेच दुरुस्तीची कामे ‘रस्ते दुरुस्ती (मुख्यालय)’ या लेखाशीर्षातून करण्याचे प्रस्तावित आहे.
दरवर्षी खड्ड्यांवर कोट्यवधी खर्च
पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर महापालिकेकडून तातडीच्या दुरुस्तीची घोषणा केली जाते. यंदाही दोन कोटींच्या निधीतून खड्डे बुजवण्याची तयारी सुरू झाली आहे. मात्र, दरवर्षी दुरुस्तीनंतर पुन्हा त्याच रस्त्यांवर खड्डे पडत असल्याने दुरुस्तीच्या दर्जावर प्रश्नचिन्ह कायम आहे. त्यामुळे यंदाच्या कामांमध्ये गुणवत्ता राखली जाणार का, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.