
ठाणे : मालमत्ता कर विभागाने कर वसुलीत आघाडी घेतल्याने ठाणे महापलिकेच्या तिजोरीत तीन महिन्यांत ४१९ रुपयांची भर पडली आहे. करदात्यांच्या विक्रमी प्रतिसादामुळे पालिकेची घसरलेली आर्थिक गाडी रुळावर येण्यास मदत मिळणार आहे.
महापालिकेच्या तिजोरीत तुर्तास १०० कोटीहून अधिकची शिल्लक सध्या महापालिकेच्या विविध विभागांनी एप्रिल ते जून या कालावधीत ४१९ कोटींची वसुली केली आहे. त्यातही यात मालमत्ता करापोटी २९१ कोटी सर्वाधिक वसुली केली आहे, तर सर्वात कमी वसुली ही समाजविकास विभाग आणि नाट्यगृहाकडून अवघ्या १ लाखांची वसुली करण्यात यश आले आहे. त्यानुसार तीन महिन्यांत २० टक्यांच्या आसपास वसुली झाल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे.
ठाणे महापालिकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षात मालमत्ता कर विभागाला ८५० कोटी रुपयांच्या कर वसुलीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. त्यापैकी वर्षाअखेर म्हणजेच मार्च महिनाअखेर ८१० कोटी रुपयांची कर वसुली करण्यात मालमत्ता कर विभागाला यश आले होते. ९५ टक्क्यांच्या आसपास मालमत्ता कराची वसुली झाली असली तरी, गेल्यावर्षीच्या तुलनेत या कर वसुलीत १०८ कोटी रुपयांनी वाढ झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला होता. यंदाच्या वर्षात म्हणजेच २०२४-२५ या आर्थिक वर्षात पालिकेने मालमत्ता कर विभागाला ८१९ कोटी ७१ लाख रुपयांच्या करवसुलीचे उद्दिष्ट ठरवून दिले असून हे उद्दिष्ट गाठण्यासाठी मालमत्ता कर विभागाने १ एप्रिलपासूनच पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून १ एप्रिल रोजीच या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके पालिकेने करदात्यांपर्यत पाठवली आहेत. त्याबद्दलचा लघुसंदेश (एसएमएस) मालमत्ता करदात्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर पाठविला होता. त्यास प्रतिसाद देत ठाणेकर करदात्यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच महापालिकेने मालमत्ता कराच्या सामान्य करात १० टक्के सवलत दिल्याने त्याचाही परिणाम उत्पन्नवाढीसाठी झाल्याचे दिसून आले आहे. जून महिन्यापर्यंत मालमत्ता कर विभागाने २९१ कोटींची वसुली केली आहे.
दुसरीकडे शहर विकास विभागाने देखील यंदा चांगली सुरुवात केल्याचे दिसत आहे. या विभागाला ६५० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार आतापर्यंत ८७.३३ कोटींची वसुली झाली आहे. पाणीपुरवठा विभागाने ८.६३ कोटींची वसुली केली आहे. पाणीपुरवठा विभागाकडून आता दर तीन महिन्यांनी पाण्याची बिले अदा केली जात आहेत. त्यानुसार पुढील काळात वसुली आणखी वाढलेली असेल असा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे. या विभागाला २६२ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. परंतु पाणीपुरवठा विभाग हा काहीसा पिछाडीवर गेल्याचे चित्र आहे. ठाणे महापालिकेच्या विविध विभागाकडून २०५० कोटींचे मूळ अंदाज निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार आतापर्यंत ४१९.३९ कोटींची वसुली झाली.
विभागवार करवसुली
पाणीपुरवठा विभाग ८.६३ कोटीं
सार्वजनिक बांधकाम विभागाने ६.३० कोटी
अग्निशमन दल ८.३० कोटी,
स्थावर मालमत्ता विभाग ०.८९ लाख,
घनकचरा .०९ लाख
वृक्ष प्राधिकरण विभाग १.६४ कोटी
शासन अनुदान
अपेक्षित १२३३.७९ कोटी
मिळालेले उत्पन्न - ३०८ कोटी
स्टॅम्प ड्युटी - अपेक्षित २०० कोटी
मिळालेले ९३.१२ कोटी