ठाणे : अखेर दोन वर्षांनंतर पालिकेला आपण घेतलेल्या निर्णयाची आठवण झाली असून कोरोना काळात पार्किंग प्लाझा या ठिकाणी बांधण्यात आलेल्या तात्पुरत्या रुग्णालयाचे साहित्य कळवा रुग्णालयात हलवण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
कोरोना काळात तात्पुरत्या स्वरूपात रुग्णांना उपचार मिळावेत, यासाठी पार्किंग प्लाझा येथे रुग्णालय उभारण्यात आले होते. तेथील साहित्य कळवा रुग्णालय येथे हलविण्यात येईल, असा निर्णय २०२३ मध्ये झाला होता. परंतु दोन वर्षे उलटूनही येथील साहित्य काही हलविण्यात आले नव्हते. आता ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने येथील साहित्य हलविण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे.
या ठिकाणी असलेला ऑक्सिजन प्लान्ट आणि पीसीए प्लान्ट हलविण्यासाठी निविदा काढण्यात आली असून हे साहित्य महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलविण्यात येणार आहे. ठाणे महापालिका काही वर्षांपूर्वी कोरोनाचा संसर्ग वाढला होता. रुग्ण संख्येत मोठी वाढ होत असताना, त्या तुलनेत उपचारासाठी सुविधा पुरेसी नव्हती. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने तात्पुरती रुग्णालये उभारण्यास सुरुवात केली होती.
पार्किंग प्लाझामधील साहित्य
एक हजार खाटांच्या क्षमतेचे ग्लोबल रुग्णालय उभारण्यात आले होते. त्यानंतर एक हजार खाटांचे पार्किंग प्लाझा रुग्णालय उभारण्यात आले होते. महापालिकेच्या ग्लोबल, पार्किंग प्लाझा आणि व्होल्टास रुग्णालयांमध्ये पालिकेने प्राणवायू निर्मितीचा प्रकल्प उभारला होता. पार्किंग प्लाझा येथे ३ ऑक्सिजन प्लांट होते, त्यातील दोन १३ किलो लिटर आणि एक १० किलो लिटर क्षमतेचा होता. तसेच हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे देखील तीन पीसीए प्लांट या ठिकाणी उभारण्यात आले होते. ते देखील ५ मेट्रिक टनचे होते. तसेच याठिकाणी नवीन बेड, खाटा, चादरी, टेबल, फुड टेबल आदींसह इतर महत्त्वाचे साहित्य पार्किंग प्लाझा येथे धूळखात पडले असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.
साहित्य हलविण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. येथील ऑक्सिजन प्लांट आणि पीसीए प्लांट महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलविण्यात येणार आहे. यासाठी सुमारे ५० लाखांचे खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. येत्या महिनाभरात हे साहित्य कळवा रुग्णालयात हलविण्यात येणार आहे. याशिवाय इतर साहित्य हे ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय आणि पालघर जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांसाठी देण्यात येणार आहे. त्या संदर्भात तेथील रुग्णालयांशी पत्रव्यवहार करण्यात आला होता.
- उमेश बिरारी, उपायुक्त