

ठाणे : पालिकेवर असलेला अतिरिक्त कामाचा ताण कमी होणार असून लवकरच सात नवीन सहाय्यक आयुक्त पालिकेच्या सेवेत दाखल होणार आहेत. नवीन दाखल होणाऱ्या सहाय्यक आयुक्तांमुळे ठाणे महापालिकेमार्फत देण्यात आलेल्या कार्यालयीन अधीक्षक आणि इतर सहाय्यक आयुक्तांना देण्यात आलेला अतिरिक्त कार्यभार कमी होणार आहे.
ठाणे महापालिकेत मागील काही महिन्यांपासून अधिकारी, कर्मचारी हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे पालिकेकडे उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांवरील ताण वाढत असल्याचे दिसून आले आहे. तसेच नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्यातही पालिकेपुढे आस्थापना खर्चाच्या अडचणी आहेत. त्यात मागील काही महिन्यांपासून ठाणे महापालिकेत सहाय्यक आयुक्त देखील कमी झाल्याने, ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कार्यालयीन अधीक्षकांच्या खांद्यावर सहाय्यक आयुक्तपदाची मदार सोपविण्यात आली आहे. तसेच काही सहाय्यक आयुक्तांना इतर प्रभाग समितीचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे एकाच वेळेस एक ते तीन प्रभाग समितीचा कारभार हाकतांना सहाय्यक आयुक्तांवरील ताण वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळत होते. तसेच त्याचा परिणाम कामावर देखील होतांना दिसून आला आहे.
दुसरीकडे कार्यालयीन अधीक्षकांच्या खांद्यावर सहाय्यक आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने पालिकेवर टीका देखील झाली होती. त्यामुळे रिक्त असलेल्या पदांवर सहाय्यक आयुक्त मिळावेत यासाठी महापालिकेने राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर आता ठाणे महापालिकेला एकाच वेळेस सात सहाय्यक मिळालेत आहेत. या संदर्भातील आध्यादेश राज्यशासनाकडून मंगळवारी काढण्यात आले आहेत. परंतु ज्या कार्यालयीन अधीक्षकांच्या खांद्यावर सहाय्यक आयुक्तपदाची धुरा देण्यात आली होती. त्यांना मूळ पदावर आणले जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच नव्याने दाखल झालेल्या सहाय्यक आयुक्तांना कोणत्या विभागाचा कार्यभार सोपविला जाणार, हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
या अधिकाऱ्यांचा समावेश
यात गौरव वांदेकर, शिवप्रसाद नागरगोजे, स्वप्नील चव्हाण, अर्जुन सुरवसे, विजय कावळे, सोमनाथ बनसोडे आणि सोनल काळे हे आता ठाणे महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर रुजू होणार आहेत. ही पदे भरली गेल्याने आता ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांवरील ताण काही प्रमाणात कमी होणार आहे
१८ पदे मंजूर
ठाणे महापालिकेत १८ सहाय्यक आयुक्तांची पदे मंजूर आहेत. त्यातील १० पदे भरली गेली आहेत. तीन पदांवर पालिकेचे अधिकारी आहेत. त्यानुसार आठ पदे रिक्त असल्याची माहिती ठाणे महापालिकेने दिली आहे.